नाशिक : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घमासान आणि फसवणुकीच्याही घटना घडताना दिसून येत आहेत. सध्या सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर केली जात असून विविध पक्षातील विद्यमान आमदार आणि इच्छुक उमेदवार पक्षाच्या अधिकृत यादीकडे लक्ष लावून आहेत. यादीत आपले नाव येते की नाही, आपल्याला यंदा तिकीट मिळते की नाही, अशा प्रश्नांसह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बंगल्यावर धाव घेत आहेत. भाजपने (BJP) 99 उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली असून अद्याप दुसरी यादी वेटिंगवर आहे. त्यामुळे, काही इच्छुक उमेदवार व आमदार यादीची वाट पाहत आहेत. त्यातच, नाशिकमधील (Nashik) भाजपच्या विद्यमान आमदाराला तिकीट देण्यासाठी तब्बल 50 लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 


भाजपाच्या विद्यमान आमदारासह राज्यातील इतर आमदारांना विधानसभेची उमेदवारी पाहिजे असेल तर 50 लाख रुपयांची मागणी करणारे दोघेही महाविद्यालय तरुण नाशिक पोलिसांच्या ताब्यात घेतले आहेत. सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने सगळ्याच राजकीय पक्षात इच्छुकांची संख्या प्रमाणात असल्याचे पाहायला मिळत आहे. याचाच फायदा घेत दोन महाविद्यालय तरुणांनी सत्ताधारी पक्षाचे नाशिकचे विद्यमान आमदारांना फोन करुन 50 लाखांची मागणी केलीय. आम्ही पीएमओ कार्यालयातून बोलतो आहे, तुम्हाला जर उमेदवारी पाहिजे असेल तर 50 लाख रुपये द्यावे लागतील, असे दूरध्वनी वरून सांगण्यात आले. मात्र, विद्यमान आमदारांना शंका आल्याने त्यांनी या संदर्भात नाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यात अज्ञात विरोधात तक्रार दिली होती. या घटनेची गांभीर्यता पाहून पोलीस आयुक्तांनी तपास गुन्हे शाखे युनिट 1 कडे वर्ग केला होता. नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेने घटनेचा तपास केला असता, दोघांनाही दिल्लीहून ताब्यात घेतलं आहे. तसेच, या दोघांची सखोल चौकशी केली असता त्यांनी नाशिक शहरात भाजपचे विद्यमान आमदार तसेच अहमदनगर आणि ठाणे जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना फोन केल्याची कबुली दिली. त्यामुळे, राजकीय पक्षांच्या जागावाटपाचा फायदा उचलत आमदारांनाही गंडा घालणारे ठग पाहायला मिळत आहे. 


दरम्यान, राजकीय नेत्यांचीही निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तिकीट वाटपाच्या नावाखाली फसवणूक होत असल्याने पोलिसांनी जागरुक राहण्याचे आवाहन केलं आहे. दरम्यान, महायुती व महाविकास आघाडीतील सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या एक-एक याद्या जाहीर झाल्या आहेत. आता, सर्वांना दुसऱ्या व अंतिम याद्यांची प्रतिक्षा आहे. 


हेही वाचा


एकनाथ शिंदे-फडणवीसांचा मोठा डाव, आदित्य ठाकरेंविरुद्ध उतरवला खासदार; वरळीत तिरंगी लढत फिक्स