मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या ऐतिहासिक निकालानंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे कमालीची बदलली आहेत. आतापर्यंत कितीही चढउतार आले असले तरी पश्चिम महाराष्ट्र हा शरद पवारांचा बालेकिल्ला मानला जात होता. मध्यंतरीच्या काळात भाजपने पश्चिम महाराष्ट्रात मुसंडी मारली असली तर या भागातील शरद पवार यांच्या वर्चस्वाचा पगडा कमी झाला नव्हता. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी हा समज पार धुळीला मिळवल्याचे चित्र आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एकूण 58 विधानसभा मतदारसंघांपैकी 46 जागांवर महायुतीला विजय मिळाला आहे. यामध्ये भाजपचे 24, अजित पवार गटाला 11, शिंदे गटाला मिळालेल्या 7 जागांचा समावेश आहे. तर महाविकास आघाडीला मिळालेल्या 12 जागांमध्ये शरद पवार गटाच्या 7, ठाकरे गटाच्या 2 आणि काँग्रेसला मिळालेल्या एका जागेचा समावेश आहे.
साखर पट्ट्यात भाजप आणि महायुतीला मिळालेल्या या अभूतपूर्व यशामुळे शरद पवारांचा सर्वात भक्कम बालेकिल्ला ढासळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. आतापर्यंत शरद पवार यांनी सहकारी संस्था, साखर कारखाने आणि सहकार चळवळीची सांगड घालून पश्चिम महाराष्ट्रात स्वत:च्या पक्षाची मोठी ताकद उभी केली होती. 2014 नंतर भाजपने देशात आणि राज्यात सत्ता काबीज केली असली तरी शरद पवारांच्या पश्चिम महाराष्ट्रातील वर्चस्वाला मोठा धक्का बसला नव्हता. राज्यात कितीही नुकसान झाले तरीही जोपर्यंत पश्चिम महाराष्ट्रातील शरद पवारांची ताकद कायम आहे तोपर्यंत पवार ब्रँडला धक्का लागणार नाही, असे एक गृहितक होते. परंतु, यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाने हे गृहीतक पूर्णपणे मोडूनतोडून टाकले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यातील 21 पैकी 11 जागा जिंकल्या होत्या. तर पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला एकूण 27 जागा मिळाल्या होत्या. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांना पश्चिम महाराष्ट्रात अवघ्या 7 जागा मिळाल्या आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे सातारा आणि कोल्हापूर या बालेकिल्ला समजला जाणाऱ्या भागांमध्ये शरद पवार गटाला एकही जागा न मिळण्याची नामुष्की ओढावली आहे.
महाविकास आघाडी पश्चिम महाराष्ट्रात फेल का झाली?
यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपापासूनच महाविकास आघाडीत कुरबुरी सुरु असल्याचे चित्र दिसत होते. त्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण, यावरुन काँग्रेस आणि ठाकरे गटात वाद रंगला होता. त्यामुळे ग्राऊंड लेव्हलला महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये फारसा समन्वय नव्हता. याचा फटका शरद पवार गटाला आणि पर्यायाने मविआला बसला. याशिवाय, भाजपने या भागात पूर्वी काँग्रेसमध्ये असलेल्या अनेक नेत्यांना रिंगणात उतरवले होते. तसेच लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीच्या बाजूने निर्माण झालेले वातावरण मविआला आपल्या बाजूने वळवणे शक्य झाले नाही. शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या सभांमध्ये कापूस आणि सोयाबीनसह शेतमालाच्या दराचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा मुद्दा शेतकरी वर्ग आणि स्थानिक मतदारांना तितकासा भावला नाही.
आणखी वाचा
Sharad Pawar : देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे नवे चाणक्य, शरद पवारांचा करिष्मा फेल!