Maharashtra Vidhansabha Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुती मैदानात उतरले आहे. प्रहारचे बच्चू कडू आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांची तिसरी आघाडी देखील निवडणुकीला सामोरे जात आहे. याशिवाय महाविकास आघाडी आणि महायुतीमधील अनेक बंडखोर देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोणाला किती यश मिळेल याबाबतचा IANS-Matrize चा सर्व्हे समोर आलाय. या सर्व्हेमध्ये महाराष्ट्रात कोणत्या विभागात कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या आहेत, हे जाणून घेऊयात...
पश्चिम महाराष्ट्रात भाजप मुसंडी मारणार?
पश्चिम महाराष्ट्रात एकूण 70 जागा आहेत. त्यापैकी महायुतीला 31 ते 38 जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे, तर महाविकास आघाडीला 29 ते 32 जागा मिळतील, असं सर्व्हेतून समोर आलं आहे. याशिवाय दोन जागा इतर पक्षांना मिळू शकतात. महायुतीचं वोट शेअर 48 टक्के आहे, तर महाविकास आघाडीला 40 टक्के मतं मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विदर्भात कोम वरचढ ठरणार?
विदर्भात विधानसभेच्या एकूण 62 जागा आहेत. त्यापैकी महायुतीला 32 ते 37 जागा मिळतील, असा अंदाज IANS-Matrize च्या सर्व्हेने व्यक्त केलाय. तर महाविकास आघाडीला 21 ते 26 जागा मिळतील, असं सर्व्हेतून समोर आलं आहे. याशिवाय विदर्भातील टक्केवारीचा विचार केला तर महायुतीला 48 टक्के मतं मिळू शकतात. तर महाविकास आघाडी 39 टक्के मतं खेचून आणू शकते.
मराठवाड्यात कोण बाजी मारणार?
मराठवाड्यात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात विधानसभेच्या 46 जागा आहेत. त्यापैकी 20 ते 24 जागांवर महाविकास आघाडी मुसंडी मारु शकते. तर महायुतीला 18 ते 24 जागांवर समाधान मानावे लागू शकते. मराठवाड्यात 44 टक्के महाविकास आघाडीला मिळू शकतात. तर महायुतीला 47 टक्के मतं मिळतील, असा अंदाज आहे.
ठाणे आणि कोकणात कोण सरस?
ठाणे आणि कोकणात एकूण 39 जागा आहेत. यातील 23 ते 25 जागांवर महाविकास आघाडीला यश मिळू शकतं. तर महाविकास आघाडी 10 ते 11 जागांवर मुसंडी मारु शकते. कोकण विभागात महायुतीला 52 टक्के मतं मिळू शकतात. तर महाविकास आघाडीला 32 टक्के मतं मिळतील असा अंदाज आहे.
मुंबईत महाविकास आघाडी किती जागांवर मुसंडी मारणार?
मुंबईत विधानसभेच्या 36 जागा आहेत. त्यातील 21 ते 26 जागांवर महायुतीचा विजय होऊ शकतो. तर महाविकास आघाडीला 10 ते 13 जागा मिळू शकतात. मुंबईत महायुतीला 47 तर महाविकास आघाडीला 41 टक्के मतं मिळतील, असा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्रात कोणाचं पारड जड?
उत्तर महाराष्ट्रात विधानसभेच्या 35 जागा आहेत. यातील 14 ते 16 जागांवर महायुती बाजी मारु शकते. महायुतीची मतांची टक्केवारी 45 इतकी असेल. तर महाविकास आघाडीला 47 टक्के मतांसह 16 ते 19 जागा मिळू शकतात, असं सर्व्हेतून समोर आलंय.
इतर महत्त्वाच्या बातम्या