Maharashtra Assembly Election 2024 मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या 288 जागांसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून राज्यभरात प्रचार सुरु आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांकडून राज्यातील विविध भागात प्रचार सुरु आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात राजधानी  मुंबईतील प्रचाराचा जोर वाढेल.  मुंबईत विधानसभेचे एकूण 36 मतदारसंघ आहेत. मुंबईत महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, काँग्रेस, समाजवादी पक्ष यांचे उमेदवार रिंगणात आहेत. दुसरीकडे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांची महायुती लढतेय. मनसे आणि वंचितनं देखील मुंबईत उमेदवार दिले आहेत. याशिवाय काही मतदारसंघात अपक्ष उमेदवार देखील आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असताना  IANS- MATRIZE च्या सर्व्हेची आकडेवारी समोर आलेली आहे. यामध्ये मुंबईतील 36 जागांवर कोण बाजी मारणार याबाबत अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 


महायुतीत मुंबईत कोण किती जागा लढतंय?


महायुतीत मुंबईत भाजपकडून 17 जागा लढवल्या जात आहेत. एकनाथ शिंदे यांची शिवसेना 16 जागा लढतेय. तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून 3 जागा लढवल्या जात आहेत. मानखुर्दच्या जागेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवाब मलिक तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून सुरेश पाटील निवडणूक लढवत आहेत. 


महाविकास आघाडीत कोण किती जागा लढतंय?


मुंबईत महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मुंबईत 22 जागा लढवल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून 2 जागा लढवल्या जात आहेत. काँग्रेस मुंबईत 11 जागा लढतंय, तर, समाजवादी पक्षाचा 1 उमेदवार रिंगणात आहे. 


IANS- MATRIZE च्या सर्व्हेनुसार मुंबईत मविआला आणि महायुतीला कितीजागा मिळण्याचा अंदाज?


IANS- MATRIZE च्या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीपेक्षा महायुतीला जास्त जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महाविकास आघाडीत मुंबईत सर्वाधिक जागा लढवणाऱ्या  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 5-9  च्या दरम्यान जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर,  काँग्रेसला 4-8 च्या दरम्यान जागा मिळू शकतात. याशिवाय  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला 0-4 च्या दरम्यान जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  समाजवादी पार्टीला 0-4 जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाविकास आघाडीला मुंबईत 41 टक्के मतं मिळू शकतात तर त्यांना 10-13 दरम्यान जागा मिळतील, असा अंदाज  IANS- MATRIZE चा आहे.


महायुतीमध्ये भाजपला 13-17 दरम्यान जागा मिळू शकतात, असा अंदाज IANS- MATRIZE नं वर्तवला आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मुंबईत 7-11 च्या दरम्यान  जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1-5 च्या दरम्यान जागा मिळतील,  असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  महायुतीला मुंबईत 21-26 जागा मिळण्याचा अंदाज आहे. महायुतीला 47 टक्के मिळू शकतात, असा सर्व्हेचा अंदाज आहे. 


मुंबईत मनसेला 0-4 दरम्यान जागा मिळू शकतात आणि इतरांना 0-4 जागा मिळू शकतात, असा अंदाज IANS- MATRIZE नं वर्तवला आहे. 



इतर बातम्या :


फटाके वाजवणाऱ्यांवर चिडले, मोदींनाही लगावला मिश्कील टोला; राज ठाकरेंनी मुंबईतील सभा गाजवली