ठाणे : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वच मतदारसंघात पोलिसांकडून (Police) झाडाझडती सुरू असून गेल्या महिनाभरात तब्बल 280 कोटी रुपयांची रोकड पोलिसांकडून व भरारी पथकाकडून जप्त करण्यात आली आहेत. निवडणुकांच्या तारखा जवळ येत असतानाच भरारी पथकेही चांगलेच सक्रीय झाले आहेत. त्यानुसार, अनेक ठिकाणी रोकड व मौल्यवान वस्तू जप्त केल्या जात आहेत.  दरम्यान, आजच विक्रोळी विधानसभा मतदारसंघात पोलिसांकडून तब्बल 6500 किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. मात्र, ही चांदी अधिकृत असून गोदामात ठेवण्यासाठी व्हॅनमधून नेण्यात येत होती, अशी माहिती मिळाली आहे. आता, कल्याणमध्ये (Kalyan) एटीएम व्हॅन ताब्यात घेण्यात आली आहे. या व्हॅनमधून 1 कोटी 20 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.  


कल्याण गांधारी परिसरात निवडणूक भरारी पथकाकडून वाहन तपासणी दरम्यान एका एटीएम व्हॅनमध्ये एक कोटी रुपयांची रोकड आढळून आली आहे. या व्हॅनमध्ये एकूण रक्कम 1 कोटी 20 लाख रुपये असल्याची माहिती आहे. मात्र, या रक्कमेमध्ये तफावत आढळून आल्याने अधिकाऱ्यांनी व्हॅन ताब्यात घेतली आहे. व्हॅनमध्ये असलेल्या व्यक्तीकडे चौकशी केली असता व्हॅनमधील कर्मचाऱ्यांनी योग्य उत्तरं न दिल्याने व्हॅनची चौकशी सुरू करण्यात आली आहे. सध्या येथील रक्कमेची जुळवाजुळव सुरू आहे, सर्व रक्कम आयकर विभागाकडे पाठवण्यात येणार असून पुढील चौकशी सुरू आहे. 


कोल्हापुरात उत्पादन शुल्क विभागाची कारवाई


विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोल्हापुरात देखील मोठी कारवाई केली आहे. येथील रंकाळा तलाव परिसरात गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणार वाहन पकडण्यात आले. तब्बल 9 लाख 78 हजार रुपयांच्या दारूसह 14 लाख 28 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल याठिकाणी पोलिसांनी जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर भरारी पथकाने ही कामगिरी केली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडा घाटातील प्रसाद नराम यास अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. 


हेही वाचा


विधानसभेची खडाजंगी: आष्टी मतदारसंघात चौरंगी लढत, महायुतीत मैत्रीपूर्ण, तर बंडखोर धोंडेंचाही अपक्ष अर्ज; कोण मारणार बाजी?