Maharashtra Vidhansabha Election : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 5 वर्षात अनपेक्षित घटनाक्रम पाहायला मिळाले आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. निवडणूक एकतर्फी होणार असं वाटत असतानाच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जोरदार प्रचार करत निवडणुकीला निर्णायक मतं वळवली होती. 2019 मध्येही अनेकांनी वेगवेगळ्या पक्षात उड्या घेतल्या होत्या. मात्र, 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात गोंधळाची परिस्थिती आहे. अगदी एखादा नेता रातोरात दुसऱ्या पक्षात प्रवेश करुन तिकीट मिळवताना दिसतोय. शिवाय, दुसऱ्या पक्षातून आलेल्या आयारामांना तिकीटही दिले जात आहे. याशिवाय महाविकास आघाडी आणि महायुती एकत्रितपणे लढत असताना देखील त्यांनी काही ठिकाणी एकमेकांविरोधात उमेदवार दिले आहेत. 


भाजपचे 12 दिग्गज नेते शिंदेंच्या शिवसेनेकडून विधानसभा लढणार


माजी केंद्रीय मंत्री नाराणय राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करुन निवडणुकीला सामोरे जात आहेत. शिंदेंच्या शिवसेनेने निलेश राणे यांना कुडाळ-मालवणमधून उमेदवारी दिली आहे. 


भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांनी देखील शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. त्या कन्नड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.


भाजप नेते राजेंद्र गावीत हे देखील शिंदेंच्या सेनेत दाखल झाले असून ते पालघर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 


विलास तरे यांनी देखील विधानसभेसाठी शड्डू ठोकलाय. यापूर्वी ते भाजपमध्ये होते. आता त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत बोईसरमधून विधानसभा लढण्याचा निर्णय घेतलाय.


भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदेंनी संतोष शेट्टी यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी देखील काही दिवसांपूर्वी भाजपमधून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. 


अंधेरीतील दिग्गज नेते मुरजी पटेल भाजपमध्ये अनेक वर्ष काम करत होते. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. ते अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. 


अमोल खताळ संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. संगमनेरमधून निवडणूक लढण्यास सुजय विखे आग्रही होते. मात्र, ऐनवेळी त्यांचं तिकीट कापण्यात आले. अमोल खताळ यांनी देखील भाजपमधून शिंदे गटात प्रवेश केलाय. 


शायना एन सी या देखील भाजपमध्ये होत्या. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमधून शिंदे गटात प्रवेश केला. त्यांना मुंबादेवीमधून निवडणूक लढणार आहेत. 


अजित पिंगळे यांनी भाजपमधून शिंदे गटात प्रवेश केला, त्यांना धाराशिवमधून उमेदवारी देण्यात आली. 


करमाळा विधानसभा मतदारसंघात दिग्वीजय बागल यांनी शिंदे गटात प्रवेश केला आणि त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी जवळपास 6 महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 


नेवासामध्ये विठ्ठल लंघे यांना नेवासामधून शिंदेंनी उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वी ते देखील भाजपमध्ये कार्यरत होते. 


बळीराम शिरसकर यांना ठाकरेंच्या नितीन देशमुख यांच्याविरोधात उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वी बळीराम शिरसकर भाजपमध्ये होते. 


भाजपमधून आलेल्या नेत्यांना अजित पवारांचं तिकीट 


1. राजकुमार बडोले
2.प्रताप पाटील चिखलीकर 
3. निशिकांत पाटील
4.संजय काका पाटील 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Smita Patil : 'अजितदादांमध्ये आम्ही आबांना पाहतो, रोहित पाटलांविरोधात प्रचार करावा पण...' आर आर पाटलांच्या कन्येचं आवाहन