पालघर : राज्यातील विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले असून सर्वच राजकीय पक्ष मैदानात उतरले आहेत. दुसरीकडे प्रशासन आणि निवडणूक आयोगाने देखील आदर्श आचारसंहिता असल्याने कटाक्ष ठेवला आहे. प्रत्येक मतदारसंघात पोलीस व संबंधित यंत्रणा कामाला लागली असून नाकाबंदी, वाहनांची तपासणी व आचारसंहिता भंगसंदर्भाने योग्य ती खबरदारी घेत आहे. मात्र, दररोज कुठे ना कुठे रोकड किंवा अवैध पैसे, वस्तू जप्त केल्या जात आहेत. भिवंडीनंतर आज पालघरच्या (Palghar) उधवा येथे तलासरी पोलिसांनी तब्बल 4 कोटी 33 लाखांची रोकड जप्त केली आहे. विशेष म्हणजे ही रोकड दादरा नगर हवेलीतून महाराष्ट्रात येत असताना ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. पालघर जिल्ह्यातील तलासरीच्या उधवा तपासणी नाक्यावर ही रोकड आणि रोकड वाहतूक करणारी व्हॅन तलासरी पोलिसांनी ताब्यात घेतली. त्यानंतर, तलासरी येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळतय.
निवडणुकांमध्ये सर्रासपणे पैशाचा वापर होत असून याची कसून तपासणी आता निवडणूक आयोगाने करावी, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे डहाणूचे आमदार विनोद निकोल यांनी केली आहे. तर हे पैसे दादरा नगर हवेलीतील एका बँकेचे असल्याचं निवडणूक आयोग आणि प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, दादरा नगर हवेलीतील इतकी मोठी रक्कम महाराष्ट्राच्या हद्दीत चुकून येते कशी, असा सवाल आमदार व कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जातोय. त्यामुळे, या रकमेमागे काही गौडबंगाल तर नाही ना, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भरारी पथके तैनात असून पोलीस यंत्रणाही सज्ज आहे. काही दिवसनापूर्वीच पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर येथे पोलिसांनी एक कार जप्त केली होती. त्यामध्ये, तब्बल 5 कोटी रुपयांची रोकड आढळून आली होती. त्यानंतर, पुणे शहरातच सोन्याच्या दागिन्यांची वाहतूक करणारा टेम्पोही पोलिसांनी ताब्यात घेतला होता. मात्र, तो टेम्पो व्यापाऱ्यांचा व मुंबईतून पुण्यात उतरत असल्याचे पोलिसांनी सांगितले होते.
187 कोटींची रक्कम जप्त
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 15 ऑक्टोबर 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत 15 ते 30 ऑक्टोबर 2024 पर्यंत एकूण 187 कोटी 88 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली. निवडणूक आचारसंहितेच्या काळात सजगपणे कार्यरत असलेल्या राज्यातील विविध अंमलबजावणी यंत्रणांनी ही कामगिरी केली आहे. विविध ठिकाणी पोलीस विभाग आणि इतर यंत्रणांनी उभारलेले तपासणी नाके योग्य पध्दतीने कार्यरत असल्यामुळे हे यश मिळाले आहे. यामध्ये प्रामुख्याने राज्य पोलीस विभागाने सुमारे 75 कोटी रूपये, इन्कमटॅक्स विभागाने सुमारे 60 कोटी रूपये, राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुमारे 11 कोटी रूपये यांचा प्रामुख्याने समावेश आहे. दरम्यान, मतदारांना आचारसंहिता भंगाचा प्रकार आढळल्यास आयोगाच्या ‘सी-व्हिजील’ ॲपवर तक्रार करता येते. या तक्रारींची माहिती सर्व अंमलबजावणी यंत्रणांना दिली जात असल्याने आवश्यक ठिकाणी जप्तीची कारवाई केली जात आहे.
हेही वाचा
भिवंडीत कारमध्ये घबाड, रोकड जप्त; मतदारसंघात स्टॅटिक सर्विलन्स टीमची कारवाई