Maharashtra Winter Session 2024 नागपूर :  विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) महायुतीने अभूतपूर्व विजय मिळवला आहे. महायुतीला तब्बल 237 जागांवर यश मिळालं आहे. तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 पर्यंतचा आकडाही गाठता आला नाहीये. अशातच महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांना 29 चा देखील आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळे तीनही पक्षांपैकी एकही पक्ष विरोधी पक्षनेता पदासाठी पात्र ठरलेला नाही. त्यामुळे राज्यात विरोधी पक्षनेता पद असेल का नाही अशा शंका व्यक्त केली जात असताना मविआच्या गोटातून विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठी माहिती पुढे आली आहे.  


विरोधी पक्षनेतेपदासाठी विरोधकांकडून अद्याप अर्ज नाही- राहुल नार्वेकर


महाविकास आघाडीकडून अद्याप विरोधी पक्षनेतेपदासाठी अर्ज दाखल केला नसल्याची माहिती पुढे आली आहे.  विरोधी पक्षनेतेपदासाठी विरोधकांकडून अर्ज आल्यानंतर विचार केली जाणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी विरोधकांकडे आवश्यक संख्याबळ नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष हेच विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय घेतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यापूर्वीची सांगितले होते. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाबाबत मविआच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 


उद्धव ठाकरे पहिल्या दिवसापासून अधिवेशनात सहभागी होणार


दरम्यान, राज्याची उपराजधानी नागपुरात येत्या 16 ते 21 डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशन होणार आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात नवनिर्वाचित 288 आमदारांना प्रथमच डिजिटल आसन व्यवस्था मिळणार आहे. तर  अधिवेशनाच्या अनुषंगाने विधान भवन परिसरातील तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. विशेष म्हणजे 288 पैकी 78 हे पहिल्यांदाच विधानसभेत पोहचले आहे. 


त्यात भाजपचे 33, शिंदे गट शिवसेना 14, अजित पवार गट राष्ट्रवादी 8, ठाकरे शिवसेना 10, कांग्रेस 6, शरद पवार गट राष्ट्रवादी 4  व इतर 3 आमदारांचा समावेश आहे. अशातच शिवसेना पक्ष प्रमुख आणि विधानपरिषद आमदार उद्धव ठाकरे नागपूर अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून अधिवेशनात सहभागी होणार आहे. मुंबईतील विशेष अधिवेशनात उद्धव ठाकरे अनुपस्थित होते. मात्र नवीन सरकारच्या नागपूर येथील अधिवेशनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहतील, अशी माहिती पुढे आली आहे. 15 डिसेंबर रोजी उद्धव ठाकरे मुंबईतुन नागपुरला विमानाने रवाना होतील. तसेच ते 16, 17 डिसेंबर ला कामकाजात सहभागी होणार असून त्यानंतर पुन्हा मुंबईला येणार आहेत आणि त्यानंतर पुन्हा नागपूरला अधिवेशनात उद्धव ठाकरे सहभागी होतील. असेही सांगण्यात येत आहे. 


हे ही वाचा