नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून सीमावाद चर्चेत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या वाढत्या किमतींमुळं देखील चीन चर्चेत आहे. भारताची राजधानी नवी दिल्लीमध्ये मंगळवारी सोने आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली.  


99.9 टक्के शुद्ध असलेल्या सोन्याच्या दरात 820 रुपयांची वाढ पाहायला मिळाली. 10 ग्रॅम सोन्याचा दर 79780 रुपयांवर पोहोचला आहे. तर, 99.5 टक्के शुद्ध असलेल्या सोन्याचा भाव 79380 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होता. चांदीच्या दरात देखील 1 हजार रुपयांची वाढ झाली. प्रतिकिलो चांदीचा दर 94850 रुपयांवर पोहोचला आहे. 


सोने दरात वाढ होण्यामागं चीन कनेक्शन


चीनच्या केंद्रीय बँकेनं सहा महिन्यांच्या अंतरानंतर पुन्हा एकदा सोने खरेदी सुरु केली आहे. 2023 मध्ये चीननं जगात सर्वाधिक सोने खरेदी केली होती. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार पीबीओसीच्या सोने खरेदीमुळं चीनमध्ये सोन्याची मागणी वाढेल, त्याचा परिणाम जागतिक बाजारावर पडेल. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार हे पाऊल अमेरिकेकडून चीनवर लावल्या जाणाऱ्या संभाव्य टॅरिफमुळं टाकण्यात आलं आहे. ट्रम्प प्रशासनाच्या काळात टॅरिफच्या भरपाईसाठी चीन सोने वापरु शकतं.  


MCX काय किंमत होती?


स्थानिक बाजार जानकारांच्या माहितीनुसार जागतिक बाजारातील तेजी आणि चीनच्या सोने खरेदीनं किंमती वाढल्या आहेत. एमसीएक्सवर फेब्रुवारीमध्ये डिलिव्हरी होणाऱ्या सोनेच्या दरात 279 रुपयांची म्हणजेच 0.36 टक्के वाढ होऊन प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 77765 रुपयांवर पोहोचली आहे. चांदीचा दर प्रतिकिलो 95068 रुपयांवर होता.   


आंतरराष्ट्रीय बाजारात देखील तेजी


आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात देखील तेजी पाहायला मिळाली. कॉमेक्स गोल्ड वायदा 15.20 डॉलरने वाढून 2701 डॉलर प्रति औस पर्यंत पोहोचला. चांदीच्या दरात मात्र घसरण पाहायला मिळाली. चांदीचा दर 32.55 डॉलर प्रति औस वर आला.  


सोने दरात वाढ होण्याचं कारण?


दरम्यान, फेडरल रिझर्व्ह द्वारे व्याज दरात संभाव्य कपात लक्षात घेता आणि  चीनच्या सक्रियतेनं सर्राफा बाजारात तेजी पाहायला मिळाली. अमेरिकेचा अकृषिक उत्पादकता डाटा आल्यानंतर बाजारात बदल होऊ शकतात.तज्ज्ञांच्या अंदाजानुसार सोने आणि चांदीच्या दरात आणखी वाढ होऊ शकते. भारतात सध्या लग्न समारंभ मोठ्या प्रमाणावर होत असल्यानं देखील सोने खरेदी मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती आहे.


इतर बातम्या : 


Mehul Choksi : मेहुल चोक्सीशी संबंधित 2565 कोटी रुपयांच्या मालमत्तांचा लिलाव करण्यास कोर्टाची परवानगी


WhatsApp : व्हॉट्सॲपकडून लघु व्‍यवसायांना प्रशिक्षित करण्‍यासाठी मोठे पाऊल; भारत यात्रा उपक्रमाचा शुभारंभ