नागपूर: राज्यातील विधानसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर आता सर्वांनाच निकालाची उत्सुकता लागली आहे. मतदान संपल्यानंतर विविध संस्थांचे एक्झिट पोल्सचे निकाल (Maharashtra Exit Polls 2024) जाहीर झाले होते. यामध्ये महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीच्या बाजूने संमिश्र कौल पाहायला मिळाले होते. त्यामुळे राज्यात नक्की कोणाची सत्ता येणार, याबाबत आणखीनच संभ्रम निर्माण झाला होता. परिणामी आता सगळ्यांचे डोळे 23 तारखेच्या निकालाकडे लागले आहेत. अशातच आता भाजपचा बुथ लेव्हलच्या (Booth level) एक्झिट पोलचा निकाल समोर आला आहे.
राज्यात बुधवारी मतदान संपल्यानंतर भाजपने बुथ लेव्हलवरुन माहिती गोळा केली होती. या एक्झिट पोलनुसार विधानसभा निवडणुकीत महायुतीला 164 जागा तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) अवघ्या 100 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर अपक्ष व इतर उमेदवारांना 24 जागांवर विजय मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
भाजपच्या या बुथ लेव्हल एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, महायुतीमध्ये भाजपला 100, शिंदे गटाला 42 आणि अजितदादा गटाला 22 जागांवर विजय मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीत काँग्रेसला 40, शरद पवार गटाला 35 आणि उद्धव ठाकरे गटाला 25 जागा मिळण्याची शक्यता आहे. परंतु, प्रत्यक्षात निकाल काय लागणार, याचा फैसला 23 नोव्हेंबरला होईल.
राज्यात मतदानाचा टक्का वाढला
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसून आले. 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात तब्बल 61.13 टक्के मतदान झाले होते. मात्र, यंदा राज्यात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत 65 टक्क्यांच्या आसपास मतदान झाले होते. अंतिम आकडेवारीनुसार मतदानाची ही टक्केवारी 66 ते 68 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये 70 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले आहे. मुंबईत सर्वाधिक कमी म्हणजे 52.07 टक्के मतदान झाले. त्यामुळे या वाढलेल्या मतदानाचा फायदा आणि तोटा कोणाला होणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
मतदानाचा टक्का जेव्हा वाढतो तेव्हा त्याचा अर्थ प्रस्थापित सरकारविरोधातील वातावरण आहे, असा घेतला जातो. मात्र, यंदा महिला मतदारांची टक्केवारी वाढल्याने लाडक्या बहीण योजनेमुळे (Ladki Bahin Yojana) महायुतीला फायदा होईल का, वाढलेले मतदान प्रस्थापितविरोधी लाट आहे का, याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत.
आणखी वाचा