मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचा (Vidhan Sabha Election 2024 Result) निकाल लागला आहे. या निकालात महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळालं आहे. राज्यात सत्ताबदल होईल, असा दावा विरोधक करत होते. मात्र हा अंदाज साफ फोल ठरला. महायुतीच्या तिन्ही पक्षांना मिळून 50 जागांचाही आकडा गाठता आलेला नाही. दुसरीकडे एकट्या भाजपाने तब्बल 132 जागांवर बाजी मारली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहता राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? असं विचारलं जात आहे. 3 प्रमुख मुद्द्यांत राज्यात मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं पारडं जड, हे समजून घेऊ या..
भाजपाला मिळणार मुख्यमंत्रिपद?
भाजपा सलग तिसऱ्यांदा राज्यातील सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. ही निवडणूक एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजपा या तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे लढवली होती. या पक्षांनी जागावाटपादरम्यान मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीबद्दल ठोसपणे काहीही ठरवलं नव्हतं. आता मात्र या निवडणुकीत भाजपा हा पक्ष सर्वांत जास्त जागा मिळवणारा पक्ष ठरला आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपद याच पक्षाकडे जाण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे निकाल लागल्यानंतर भाजपाच्याच वाट्याला मुख्यमंत्रिपद यावे, अशी इच्छाही भाजपाचे नेते व्यक्त करताना दिसत आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच मुख्यमंत्रिपद?
महायुतीमध्ये जागावाटपाच्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्रिपदावर चर्चा झाली नव्हती. त्यामुळे पुढचा मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न अद्याप कायम आहे. निकालानंतर महायुतीतील भाजपा हा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे पक्षीय बलाबलाचा विचार करायचा झाल्यास शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्या तुलनेत भाजपा हाच पक्ष वरचढ ठऱत आहे. विशेष म्हणजे निकाल लागल्यानंतर भाजपाने मुख्यमंत्रिपदावर दावा करण्यास सुरुवातही केली आहे. भाजपाकडून मुख्यमंत्रिपदासाठी थेट देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे केले जात आहे. फडणवीसांना विरोध करणारा कोणताही चेहरा सध्यातरी भाजपात नाही. त्यामुळे सध्या मुख्यमंत्रिपदाची माळ भाजपाच्याच गळ्यात पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एकनाथ शिंदेही आग्रही, नेमकं काय होणार?
मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्षदेखील आग्रही आहे. निवडणुकीच्या निकालावर बोलताना खुद्द शिंदे यांनीच तसे संकेत दिले आहेत. जागावाटपादरम्यान मुख्यमंत्रिपदाबाबत काहीही ठरलं नव्हतं, आता आम्ही एकत्र बसून ठरवू, असं शिंदे यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते भाजपा युतीधर्म पाळेल, अशी अपेक्षा व्यक्त करत मुख्यमंत्रिपद शिवसेनेलाच मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे भविष्यात काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कोणत्या पक्षाला किती जागा?
महायुती- 236
मविआ- 49
---------------------
भाजपा- 132
शिवसेना (शिंदे गट)- 57
राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41
काँग्रेस- 16
राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10
शिवसेना (ठाकरे गट)- 20
समाजवादी पार्टी- 2
हेही वाचा :