मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा (Vidhan Sabha Election 2024 Result) निकाल लागला आहे. या निवडणुकीत जनतेने महायुतीला कौल दिला आहे. महायुतीच्या (Mahayuti) पारड्यात जनतेने मतांचं भरभरून दान दिलंय. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होता. आता मात्र राज्यातील चित्र स्पष्ट झाले आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन होणार असून त्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?
राज्यात एकूण 288 जागांसाठी मतदान झाले. यातपैकी तब्बल 132 जागांवर भाजपाने दणदणीत विजय नोंदवला आहे. या जागांसह भाजपा हा राज्यातील सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. सलग तिसऱ्या निवडणुकीत भाजपाने 100 पेक्षा अधिक जागा मिळवल्या आहेत. या निवडणुकीत भाजपानंतर एकनाथ शिंदे यांचा पक्ष दुसरा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. या पक्षाला एकूण 57 जागा मिळाल्या आहेत. तर अजित पवार यांच्या पक्षाला एकूण 41 जागांवर विजय मिळाला आहे.
महाविकास आघाडीला नेमक्या किती जागा मळाल्या?
या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने पूर्ण ताकद लावली होती. शरद पवार यांच्यासारखे नेते संपूर्ण राज्यात फिरले होते. मात्र महाविकास आघाडीला म्हणावे तसे यश आले नाही. महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाला अवघ्या 16 जागा मिळाल्या. तर शरद पवार यांच्या पक्षाला 10 जागा मिळाल्या. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला एकूण 20 जागा मिळाल्या.
कोणत्या पक्षाचं किती बळ?
महायुती- 236
मविआ- 49
---------------------
भाजपा- 132
शिवसेना (शिंदे गट)- 57
राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41
काँग्रेस- 16
राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10
शिवसेना (ठाकरे गट)- 20
समाजवादी पार्टी- 2
जन सुराज्य शक्ती- 2
राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी- 1
राष्ट्रीय समाज पक्ष- रासप- 1
एमआयएम- 1 जागा
सीपीआय (एम)- 1
पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इँडिया- पीडब्ल्यूपीआय- 1
राजर्षी शाहू विकास आघाडी- 1
अपक्ष- 2
सत्तास्थापनेच्या हालचाली, 25 तारखेला शपथविधी?
दरम्यान, राज्यात महायुतीचे सरकार येणार, हे स्पष्ट झाल्यामुळे आता सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पुढचा मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत महायुतीमध्ये खलबतं चालू झाली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार राज्यात नव्या मुख्यमंत्र्यांचा येत्या 25 नोव्हेंबर रोजी शपथविधी होणार आहे. त्याआधी मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :
विधानसभा झाली! आता लवकरच महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजणार; लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता