बारामती: राज्यभरात आज 288 जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. राज्यातील काही मतदारसंघामध्ये तगडी लढत होणार आहे, त्यापैकी एक म्हणजे बारामती (Baramati). बारामती विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. बारामती विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवारांच्या (Sharad Pawar NCP) राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्यात लढत आहे. यादरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी आज अजित पवारांच्या (Ajit Pawar) आई आणि युगेंद्र यांच्या आजी आशाताई पवार यांचा आशीर्वाद घेतला. यावेळी आजीला काय सांगितलं याबाबत युगेंद्र पवारांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे.
नेमकं काय म्हणाले युगेंद्र पवार?
'बारामतीकर नक्की शरद पवार साहेबांना आणि आम्हाला साथ देतील', असा विश्वास यावेळी युगेंद्र पवार यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर आजींचे आशीर्वाद घेण्यासाठी अजित पवारांच्या घरी जाणार होतात परंतु त्याआधीच आजी कन्हेरी इथं आल्या त्यांचा युगेंद्र पवारांनी आशीर्वाद घेतला. त्याचबरोबर त्यांच्याशी चर्चा केली, या वेळी काय बोलणं झालं त्या संदर्भात त्यांनी एबीपी माझाला माहिती दिली. युगेंद्र पवार बोलताना म्हणाले, काही योगायोग झाला माहिती नाही. मी आजीला भेटण्यासाठी अजित पवारांच्या घरी जायला निघालो. मी तिथे फोन केला आणि त्यांनी मला सांगितलं, आजी कन्हेरीला यायला निघाल्या आहेत, त्यामुळे मी गाडी वळवली आणि इथं आलो आजीचा आशीर्वाद घेतला आता पुढच्या कामासाठी निघालो आहे.
'आम्ही कधी असं राजकीय बोललो नाही. कधी राजकीय बोलत नाही. तरी त्यांना सांगितलं तब्येतीची काळजी घ्या. जास्त विचार करत बसू नका, सगळं व्यवस्थित होईल. तुम्ही नका काळजी करू इतकंच आम्ही बोललो, असं युगेंद्र पवार म्हणाले. अजित पवारांच्या सांगता सभेवेळी त्यांच्या आईने एक पत्र वाचलं होतं आमच्या दादाला साथ द्या, असं पत्र त्यांनी वाचून दाखवलं होतं. दादांवरती अन्याय झाला अशा अशी भावना होती. ती भावना आता भेटीवेळी जाणवली का? या प्रश्नावर बोलताना योगेंद्र पवार म्हणाले, 'असं काही जाणवलं नाही. ते त्यांचा पत्र कोणाचं असेल काय असेल, ते मला काहीच माहित नाही, त्याच्यावर मला काहीच भाष्य करायचं नाही. बोलायचं ही नाही. पण शेवटी एका आईसाठी एका आजीसाठी सगळे समान असतात तुम्ही कुठल्याही कुटुंबात पाहिलं तर जगात आजी-आई सगळ्यांना समान वागणूक देत असतात आणि तसेच माझ्या आजीच्या बाबतीत आहे', असं योगेंद्र पवार यांनी म्हटले आहे.