पुणे : महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील शेळके यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मावळ तालुक्यात राजीनामा सत्र सुरू होऊन बंडखोर अपक्ष उमेदवाराला सर्वांनी पाठिंबा दिला आहे. त्यांनतर आता मावळ मनसेने देखील बंडखोर अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना पाठिंबा दिला असून मावळ तालुक्यात ही परिवर्तनाची लाट असून एका अपक्ष उमेदवाराला सर्व पक्षीय पाठिंबा देण्याची ही 50 वर्षांतील पहिली वेळ असल्याचं राजकिय क्षेत्रात चर्चा सुरू आहेत.
आज मावळमध्ये सर्वपक्षीय पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेतून मनसेने बापूसाहेब भेगडे यांना पाठिंबा दिल्याचं स्पष्ट केलं आहे. मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी बापूसाहेब भेगडे यांच्यासोबत असणारे गावगुंड असा चुकीचा शब्दप्रयोग केला आहे. त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी आलो, आम्ही प्रतिनिधी लोकप्रतिनिधी सर्वजण बापूसाहेब भेगडे यांच्यासोबत आहोत. आम्ही मनसेचे सर्वजण त्यांना जाहीरपणे पाठिंबा देत असल्याचं मनसे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळस्कर यांनी म्हटलं आहे.
मावळमध्ये शरद पवार गटाचा, भाजपचा बंडखोर भेगडेंना पाठिंबा
मावळमध्ये तुतारीचा उमेदवार न देता, अजित पवार गटातून बंडखोरी केलेल्या बापू भेगडेंना शरद पवार गटाने ही पाठिंबा जाहीर केला आहे. महायुतीकडून शेळकेंना उमेदवारी जाहीर झाली आहे, त्याच दिवशी भाजपने बंडखोर बापू भेगडेंना जाहीर पाठिंबा दर्शवला. त्यानंतर भेगडेंनी शरद पवारांकडे पाठिंबा देण्याची मागणी केली होती, शेळकेंना कोंडीत अडकवण्यासाठी पवारांनी सुद्धा हा नवा टाकला आहे. बापू भेगडेंना मावळ भाजपने आधीचं पाठिंबा जाहीर केला आहे, मविआच्या जागावाटपात मावळ शरद पवार गटाच्या वाट्याला येणार होती. म्हणूनचं बंडखोर बापू भेगडेंनी शरद पवारांकडे पाठिंबा देण्याची मागणी करण्यात आली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून मावळसाठी आमदार सुनील शेळकेंना उमेदवारी जाहीर होताच मावळ तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे प्रदेशाध्यक्षांकडे पाठवले होते. त्यानंतर बापूसाहेब भेगडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा देत अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली. त्यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा करताच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा जाहीर केला होता.
मावळमध्ये अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांची ताकत आता वाढली आहे. महाविकास आघाडीसह, भाजप, मनसे यांनी देखील त्यांना पाठिंबा दिल्याने मावळ विधानसभा निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीने अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना विजयी करण्याचा निश्चय केला असल्याने आमदार सुनील शेळके यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मावळ मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे.