पुणे: दिलीप वळसे पाटील म्हणजे शरद पवारांचे मानसपुत्र, मात्र पक्षात उभी फूट पडली अन मानसपुत्राने साहेबांची साथ सोडली. त्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक पार पडतेय. आता पवार या विधानसभेत वळसे पाटलांविरोधात कोणता डाव टाकणार याकडे अख्ख्या राज्याचं लक्ष लागून होतं. हे जाणून असलेल्या पवारांनी देवदत्त निकमांना रिंगणात उतरवलं, देवदत्त निकम हे वळसे पाटलांचे बत्तीस वर्ष निकटवर्तीय राहिलेत. गुरु-चेल्याची हो जोडी होती, असं असताना पवारांनी निकमांची निवड वळसेंना घरी बसवण्यासाठी का केली असावी? असा प्रश्न राज्यातल्या जनतेला पडलाय.
माझा एकचं शब्द, दिलीप वळसेंचा शंभर टक्के पराभव करा, करा, करा. असं ठणकावून सांगणाऱ्या शरद पवारांचा हा आक्रमकपणा राज्यासाठी नवा होता. त्यात आजवरच्या मानसपुत्र समजल्या जाणाऱ्या दिलीप वळसे पाटलांविरोधात पवार असे आक्रमक झाल्यानं सर्वांचं लक्ष आंबेगाव विधानसभेकडे गेलं. ज्यांना ३५ वर्ष शक्ती दिली, ज्यांना पंचवीस वर्षे विविध मंत्रिपद दिली, ज्यांच्यावर कुटुंबातील व्यक्तींपेक्षा अधिकचा विश्वास दाखवला. आज त्यांनी गद्दारी केली, अशा गद्दारांना आता सुट्टी नाही. हे सांगण्यासाठी शरद पवार थेट आंबेगावच्या मैदानात उतरले. अन देवदत्त निकमांना यंदा आमदार करुन वळसेंना घरी बसविण्याचं आवाहन ही केलं. यानिमित्ताने पवारांनी दिलीप वळसेंचे एककाळचे निकटवर्तीय देवदत्त निकमांनाच रिंगणात उतरवण्याची खेळी केली. देवदत्त निकमांच्या रुपानेचं वळसेंचा पराभव करण्याचा डाव पवारांनी का आखलाय. याची उत्सुकता राज्याला लागून आहे. त्यामुळं देवदत्त निकम नेमके कोण आहेत, हे आधी सर्वांना जाणून घ्यावं लागेल.
देवदत्त निकम हे 1987 ते 1991 दरम्यान पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात बीएससीचे शिक्षण घेत होते, त्या काळातच ते NSUI विध्यार्थी संघटनेशी ते जुडले गेले. याचं काळात दिवंगत आमदार दत्तात्रय वळसे पाटील यांच्या संपर्कात निकम आले, निकमांनी आंबेगाव तालुक्यात कामाला सुरुवात केली. त्याचवेळी शरद पवारांनी स्वीय सहाय्यक म्हणून काम करणारे दिलीप वळसेंना 1990 आंबेगाव विधानसभेच्या निवडणुकीत संधी दिली. या प्रचारादरम्यान देवदत्त निकमांचे वळसे पाटलांशी जवळीक वाढली. पवारांनी दिलेल्या पहिल्या संधीचं सोनं करताना दिलीप वळसेंना देवदत्त निकमांची साथ लाभली. वळसेंचा निकमांवरील विश्वास वाढला अन 1992 ला तालुक्यातील नागापूर गावातील सरपंच पदी देवदत्त निकमांची वर्णी लागली. वळसेंच्या आशीर्वादाने निकमांच्या राजकीय कारकिर्दीची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. वळसेंना दुसऱ्यांदा आमदार होण्याची संधी आली, तेंव्हा ही निकमांच्या हाती प्रचाराची सगळी धुरा सोपविण्यात आली. याची पोचपावती म्हणून वळसेंनी निकमांना १९९८ ते २००३ दरम्यान नागेश्वर दूध उत्पादक सहकारी संस्था आणि थापलिंग देवस्थानचे अध्यक्ष पद दिले. वळसेंच्या आमदारकीची हॅट्रिक झाली अन 2000 साली भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदी निकमांची ही वर्णी लागली. वळसेंनी आमदारकीचा चौकार लगावला. तेंव्हा ही देवदत्त निकमांच्या कामाचा आवाका पाहून दिलीप वळसेंनी 2005 ते 2015 अशी सलग दहा वर्षे निकमांना कारखान्याच्या अध्यक्ष पदी विराजमान केलं. साखर कारखान्याच्या रुपाने निकम घरोघरी पोहचले, शेताच्या बांधावर जाऊन समस्या सोडवू लागले. निकमांचे अन शेतकऱ्यांचे नाते अतूट बनत गेले. दुसरीकडे वळसेंचा निकमांवरील विश्वास अधिक दृढ होत गेला. "वळसे म्हणतील ते धोरण अन बांधतील ते तोरण", या भूमिकेत निकम पोहचले होते. अशातच 2014 ची लोकसभा निवडणूक लागली अन अजित पवारांनी दिलीप वळसेंना शिरूर लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याचे ठरविले. पण शिवसेनेचे तेंव्हाचे खासदार शिवाजी आढळराव पाटील लोकसभेत आणि दिलीप वळसे पाटील विधानसभेत हे जुळलेलं अन चर्चेत असलेलं गणित खरंच तुटणार का? अशी चर्चा सुरु असतानाच दिलीप वळसे पाटलांनी देवदत्त निकमांचे नाव पुढं केलं. लोकसभा लढण्याची ताकद नसताना ही वळसेंच्या आग्रहास्तव निकमांनी राजकीय आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला अन अपेक्षेनुसार निकमांचा पराभव झाला. या पराभवाची परतफेड म्हणून 2015 मध्ये दिलीप वळसेंनी निकमांना कृषी उत्पन्न बाजार समितीचं सभापती पदी बसवलं. निकम याचं पदावर असताना 2019 मध्ये वळसे विधानसभेत सातव्यांदा आमदार म्हणून निवडून गेले. मात्र 2022 मध्ये निकमांचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाचा कार्यकाळ संपला अन पुढच्या कार्यकाळाची निवडणूक लागली. पण यावेळी वळसेंचा निकमांवरील विश्वास उडू लागला होता. यातूनच एक व्यक्ती, एक पद हा नियम वळसेंनी पुढं आणला. २००० पासून आत्तापर्यंत भीमाशंकर साखर कारखान्यात संचालक पदी आपण आहात, त्यामुळं तुम्हाला बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवारी देता येणार नाही. असा निकष लावून वळसेंनी निकमांना उमेदवारी नाकारली. गेली बत्तीस वर्षे "वळसे म्हणतील ते धोरण अन बांधतील ते तोरण" असं म्हणणारे त्यांचे चेले देवदत्त निकमांनी यावेळी बंड पुकारलं अन बाजार समितीत थेट गुरुवर्य दिलीप वळसेंच्या विरोधात पॅनेल उभं केलं. तेंव्हा निकम एकटेच निवडून आले, पण या निवडणुकीनंतर गुरु-चेले पुन्हा एकवटतील अशी अपेक्षा होती. पण तितक्यात जून 2023 मध्ये अजित पवारांसोबत दिलीप वळसे भाजपच्या सत्तेत सहभागी झाले. देवदत्त निकमांनी यात संधी शोधली अन ते शरद पवारांसोबत एकनिष्ठ राहिले.
दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणुकीमध्ये अमोल कोल्हे यांच्या पाठीशी देवदत्त निकम खंबीरपणे उभे राहिले. अमोल कोल्हे यांच्या विरोधात अजित पवारांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना उभे केले होते, तर आढळराव पाटील यांच्या विजयाची जबाबदारी अजित पवारांनी दिलीप वळसे पाटील यांच्या वरती सोपवली होती. या प्रचारावेळी देवदत्त निकम आणि दिलीप वळसे पाटील यांच्यात चुरस झाली होती. मात्र लोकसभेला अमोल कोल्हे यांनी मोठा विजय मिळवला. यामध्ये देवदत्त निकम यांनी मोठी जबाबदारी पार पाडली. पवारांनी निकमांची एकनिष्ठा अनुभवली अन याच एकनिष्ठतेचं फळ देण्याचं ठरवलं. यासाठी शरद पवारांनी त्यांचे मानसपुत्र दिलीप वळसेंच्या विरोधात त्यांचेच एकेकाळचे चेले देवदत्त निकमांवर विश्वास टाकला. वळसेंना सलग सात वेळा आमदार करताना प्रचाराची सगळी सूत्र देवदत्त निकमांच्या हाती असल्यानं अन आता स्वतः निकमचं रिंगणात असल्यानं वळसेंचे सगळे डावपेच निकम हेरून आहेत. म्हणूनच पवारांनी वळसेंच्या विरोधात त्यांचेच चेले निकमांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची खेळी केली. याचाच एक भाग म्हणून निकमांसाठी आंबेगावात सभा घेतली अन याच सभेत पवारांनी आजवरच्या मानसपुत्राला पाडण्यासाठीच मी आंबेगावच्या मैदानात उतरल्याचं दाखवून दिलं. इतकंच नव्हे तर दिलीप वळसे गद्दार आहेत अन आता गद्दारांना सुट्टी नाही. माझा एकचं शब्द, तुम्ही वळसे पाटलांचा शंभर टक्के पराभव करा, करा, करा. असं ठणकावून सांगितलं. अन देवदत्त निकमांना विधानसभेत पाठविण्यासाठी आंबेगावकरांना साद घातली.
शरद पवारांनी दिलीप वळसे गद्दार असल्याचं म्हटलंय खरं पण आता आंबेगावची जनता दिलीप वळसेंच्या गद्दारीवर शिक्कामोर्तब करणार का? की आठव्यांदा दिलीप वळसेंवर विश्वास दाखवणार? हे 23 नोव्हेम्बरला सिद्ध होईल.