Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून घामासन सुरू असताना दुसऱ्या बाजूने वंचित बहुजन आघाडीने उमेदवार जाहीर करण्यामध्ये चांगलीच 'आघाडी' घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज 16 जणांची चौथी यादी जाहीर केली आहे. यामध्ये कराड दक्षिणमधूनही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरुद्ध वंचित आघाडीचा उमेदवार ठरला आहे. कराड दक्षिणमधून वंचित बहुजन आघाडीकडून संजय कोंडीबा गाडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.






वंचितकडून पहिल्या तीन यादीतून 51 जणांना उमेदवारी


दरम्यान, चौथ्या यादीमध्ये शहादा, साखरी, तुमसर अर्जुनी मोरगाव, हदगाव, भोकर, कळमनुरी, सिल्लोड, कन्नड, औरंगाबाद पश्चिम, पैठण, महाड, गेवराई, आष्टी, कोरेगाव, कराड दक्षिण या मतदारसंघांमधून वंचित बहुजन आघाडीकडून चौथ्या यादीमध्ये उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वंचितकडून पहिल्या तीन यादीतून 51 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. चौथ्या यादीत 16 उमेदवारांचा समावेश आहे. आतापर्यंत 67 मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. 


विधानसभा निवडणुकांसाठी वंचितच्या 11 उमेदवारांची पहिली यादी काही दिवसांपूर्वीच जाहीर केली होती. त्यामध्ये, वंचितकडून विधानसभा निवडणुकांसाठी प्रथमच तृतीयपंथी उमेदवाराला तिकीट देण्यात आलंय. रावेर मतदारसंघातून शमिभा पाटील यांना तिकीट देण्यात आलं आहे. शमिभा या तृतीयपंथीय (transgender) असून सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे. त्यानंतर 10 मुस्लीम उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर 30 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती.


लोकसभा निवडणुकीत वंंचितला अपयश


दुसरीकडे, प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवली असली तरी त्याचा फारसा परिणाम झाला नाही. व्हीबीएला एका जागेवरही यश मिळाले नाही. खुद्द प्रकाश आंबेडकर अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीत पराभूत झाले होते. आता विधानसभा निवडणुकीत कशी कामगिरी करतात याकडे लक्ष असेल. 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात महाराष्ट्रातील सर्व 288 जागांवर मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या