बारामती: आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. आज राज्यभरात विधानसभा निवडणुकीच्या सांगता सभा पार पडत आहेत. राज्याचं लक्ष्य लागलेल्या बारामती मतदारसंघामध्ये पवार विरूध्द पवार अशी लढत होत आहे, त्याच मतदारसंघात आज शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवारांच्या (Ajit Pawar) सांगता सभा पार पडत आहेत. मी आज बारामतीकरांच्या शुभेच्छा आणि आशीर्वीद घेण्यासाठी आलो आहे. ज्यांनी या सभेचं नियोजन केलं त्यांचा अंदाज चुकला आहे, त्यांना माहिती नाही, बारामतीकरांचं आणि माझं नातं वेगळं आहे, तुमची गैरसोयय होते त्यासाठी मी क्षमा मागतो, असं अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर या सांगता सभेत बोलताना अजित पवार (Ajit Pawar)  म्हणाले आत्तापर्यंत झालेल्या 8 निवडणुकीमध्ये मी फक्त एकाच निवडणुकीमध्ये टेन्शनमध्ये होतो, असं म्हणत त्यांनी तो किस्सा सांगितला आहे. 


नेमकं काय म्हणाले अजित पवार?


बारामतीमध्ये सांगता सभेत बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, मला फक्त आत्तापर्यंत सात आणि एक खासदार म्हणजे आठ निवडणुकीमध्ये एकाच सभेमध्ये थोडंसं मी टेन्शनमध्ये होतो. ते म्हणजे 1999 मध्ये आपले गोपीनाथ मुंडे आणि नारायण राणे यांचा सरकार होतं. आपण विरोधी पक्षांमध्ये होतो त्यावेळेस सर्व पक्ष उमेदवार म्हणून आदरणीय चंद्रराव तावरे यांना उभे राहिले होते. ज्यांचे सर्वत्र संपर्क चांगले आहेत. त्यांनी त्या ठिकाणी उत्तम चालू केला होता. त्यामुळे एकास एक अशी उत्तम लढत होणार होती आणि ती झाली त्यावेळेस मी थोडासा दबकत दबकत काय होतंय काय नाही. परंतु, बारामतीकरांनी त्यावेळेस ही मला पन्नास हजार पेक्षा जास्त मतांनी निवडून दिलं आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवलं, असं अजित पवार म्हणालेत. 


 ज्या-ज्या वेळी मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेलो, त्या-त्या वेळेस मी हेच डोळ्यासमोर आणायचो, आपण काम करताना आपल्यावर जबाबदारी आहे. आपण कुठेही बारामतीकरांच्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाही. आपण कुठेही त्याबाबतीमध्ये कमी पडायचं नाही आणि विकास करत राहायचा बारामतीकरांचे प्रश्न सोडवत राहायचे. ते मी करत आलो. हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहिले. या सर्व गोष्टी करत असताना मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. मी हे ठरवलं होतं बारामती मध्ये एकही असा घटक राहता कामा नये. त्याच्याकरिता लोकप्रतिनिधी या नात्याने मी कुठेतरी कमी पडलो. त्याच्या विकासाकरिता कमी पडलो असं होता कामा नये. हे मी माझ्या डोळ्यासमोर ठेवायचो आणि त्याच्यातून भागाचा कायापालट हवा माझ्या बारामतीचा जिरायत हा शब्द जावा आणि बारामतीमध्ये सगळ्यांना सर्वांना बारामती तालुका हवाहवासा वाटला पाहिजे. या तालुक्यामध्ये जाऊन आपण आयुष्य जगावर असं वाटलं पाहिजे असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.