Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील 288 जागांवर महाविकास आघाडी (MVA) यांच्यात जागावाटप अद्याप निश्चित झालेलं नाही. जवळपास 17 जागांवर एकमत होऊ शकलं नसल्याची चर्चा आहे. त्याचवेळी विदर्भातील 7 जागांवर उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस आपापले दावे करत आहेत. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी उद्या जाहीर होणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी सांगितले. याशिवाय उद्या महाविकास आघाडीच्या जागांचे वाटपही होणार आहे.


दरम्यान, प्रस्थापित विरोधी लाटेचा फटका बसेल, अशी चर्चा रंगली असतानाही भाजपने पहिली उमेदवारी जाहीर करून बाजी मारली आहे. भाजपने पहिल्या यादीमध्ये 99 जणांना संधी देताना 89 आमदारांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. मात्र, दुसऱ्या बाजूने महाविकास आघाडीमध्ये असलेला गुंता अजूनही कायम आहे. जागावाटपाची चर्चा अक्षरशः ठप्प झाल्याची परिस्थिती महाविकास आघाडीमध्ये निर्माण झाली आहे. विशेष करून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये विदर्भातील जागांवरून चांगलाच वाद पेटला आहे. त्यामुळे एक प्रकारे मुंबईपासून दिल्लीपर्यंत दोन्ही पक्षात वादाच्या ठिणग्या पडत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी तुटते की काय? असा सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे. 


विदर्भामधील कोणत्या जागांवरून वाद पेटला?


विदर्भामध्ये आरमोरी, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चिमूर, बल्लारपूर, चंद्रपूर, रामटेक, कामठी, दक्षिण नागपूर, अहेरी, भद्रावती वरोरा या जागांवर शिवसेना ठाकरे गटाकडून दावा करण्या आला आहे. मात्र, या जागा देण्यास काँग्रेस आणि शरद पवार गटाने नकार दिल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये सुरुवातीपासूनच विद्यमान आमदार ज्या पक्षाचा आहे त्या पक्षाला ती जागा सोडली जाईल असा फॉर्म्युला ठरला होता. मात्र या जागा ठाकरे गटांकडून मागितले जात आहेत. या जागा काँग्रेसने जिंकूनही ठाकरे गटाकडून दावा केला जात असल्याने महाविकास आघाडीमध्ये गुंता वाढला आहे. त्यामुळे या जागांवर कसा तोडगा काढला जातो याकडे लक्ष असेल. 


दरम्यान, काँग्रेस आणि ठाकरे गटामधील वाद वाढत चालल्यानंतर आता या वादामध्ये मध्यस्थी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. इतकेच नाही तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सुद्धा रविवारी रात्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचले. त्यामुळे रविवारी फक्त भेटीगाठीचा सिलसिला सुरू होता. मात्र चर्चेची फेरी मात्र काही पुढे जाऊ शकली नाही. दुसरीकडे आज सकाळी संजय राऊत आणि अमित शाह यांच्या कथित भेटीच्या बातमीने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली. मात्र, संजय राऊत यांनी चर्चा झाल्या नसल्याचे सांगत खोट्या बातम्या पेरल्या जात असल्याचा आरोप केला. त्यामुळे एक प्रकारे महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा या सर्व घडामोडीमुळे समोर आली आहे. दरम्यान, 


काँग्रेस नेते म्हणाले, तीन पक्षांमध्ये जागा वाटपासाठी वेळ लागतो


महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, महाविकास आघाडीच्या शेवटच्या 17 जागांवर अद्याप चर्चा बाकी आहे. काही जागांवर ठाकरे गटाशी आमचा वाद सुरू आहे. युतीत तीन पक्ष आहेत. तीन पक्षांमध्ये जागा वाटपासाठी वेळ लागतो. असंतुष्ट कार्यकर्त्यांना आपण समजून घेऊ आणि महाविकास आघाडीसोबतच निवडणूक लढवू, असेही वडेट्टीवार म्हणाले.


दुसरीकडे भाजपने पहिला यादीत बाजी मारताना 99 उमेदवार जाहीर केले आहेत. पहिल्या यादीमध्ये भाजपकडून विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. 13 महिला सुद्धा उमेदवारीच्या रिंगणामध्ये आहेत. भाजपच्या पहिल्या यादीमध्ये मुंबईमधून 14 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. विदर्भामध्ये कुणबी उमेदवारांना सर्वाधिक संधी देण्यात आली असून मराठवाड्यामध्ये मराठा चेहरा देण्याकडे भाजपने कल दिला आहे. 


3 अपक्षांनाही तिकीट


भाजपच्या पहिल्या यादीत महेश बालदी (उरण), राजेश बकाणे (देवळी), विनोद अग्रवाल (गोंदिया) या तीन अपक्षांचा समावेश आहे.


लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या दोघांना तिकीट


मे महिन्यात चंद्रपूरमधून लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले सुधीर मुनगंटीवार यांना बल्लारपूर विधानसभेचे तर मिहीर कोटेचा यांना मुलुंडमधून तिकीट मिळाले आहे.


दोघा भावांना तिकीट मिळाले


मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांना वांद्रे पश्चिम आणि त्यांचे बंधू विनोद शेलार यांना मालाड पश्चिममधून तिकीट मिळाले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या