Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्यात विधानसभा निवडणुकीचं (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) बिगुल वाजलं आहे. त्यातच मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघाकडे आतापासूनच अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर शिवसेना शिंदे गटाकडून विद्यामान आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) आणि ठाकरे गटाकडून महेश सावंत (Mahesh Sawant) यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर महेश सावंत यांना बोलावून माहीम मतदारसंघावर चर्चा केली. तसेच माहीमवर भगवा फडकलाच पाहिजे, असा आदेशही दिला, अशी माहिती महेश सावंत यांनी दिली. 


महेश सावंत मातोश्रीवरुन बाहेर पडल्यानंतर काय म्हणाले?


आज उद्धव साहेबांना माहीममधून माझ्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली आहे. आम्ही सगळेजण मेहनत करुन आम्ही पुन्हा डौलाने माहीम मतदारसंघावर, प्रभादेवी, दादरवर शिवसेनेचा भगवा फडकवणार आहोत. कितीजणांचं आव्हान असेल, तरी जनतेला रोज, रात्री-अपरात्री भेटणारा उमेदवार जनतेला भेटलाय, जनतेच्या मनातला उमेदवार भेटलाय.  त्यामुळे आम्हाला कोणाचं आव्हान वाटत नाही. बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव साहेबांची शिवसेना जशी काम करते, तसंच आम्ही काम करणार आहोत, असं महेश सावंत म्हणाले. 


माहीमवर भगवा फडकलाच पाहिजे-


शेवटी विजय ठाकरे गटाचाच होणार आहे. 23 तारखेला आम्ही जल्लोषमध्ये आम्ही तुमच्याशी बोलू. पक्षप्रमुखांनी सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्र बसवलं. आम्हाला म्हणाले की, मला बाकी काही नको, माहीमवर भगवा फडकलाच पाहिजे. एकदिलाने काम करा, बाकी सत्ता आपलीच आहे, असे उद्धव ठाकरेंनी सांगितल्याचे महेश सावंत यांनी म्हटले. आम्ही माहीममध्ये कामाला सुरुवात केली आहे. आता अमित ठाकरे यांना ज्यांना पाठिंबा द्यायचा आहे, त्यांनी द्यावा. पण उद्धव साहेबांनी आम्हाला लढ सांगितलं आहे. मग आम्ही जिंकूनच पुन्हा मातोश्रीवर येणार, असेही महेश सावंत यांनी म्हटले.


महेश सावंत आहे तरी कोण?


महेश सावंत प्रभादेवीमधील जुने शिवसैनिक आहेत. प्रभादेवी, दादर, परळ हा भाग शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. गिरण्या जोमात असताना या कधीकाळी भागात कम्युनिस्टांचा प्रभाव होता. मात्र, कालांतराने या भागात शिवसेनेचा प्रभाव वाढला. मोठ्या प्रमाणावर मराठी माणसांची वस्ती या भागात आहे.  महेश सावंत यांचे वडील देखील शिवसेनेत होते. वडिलांच्या प्रभावाने महेश सावंत यांनी 1990 पासून शिवसेनेत सक्रियपणे काम करण्यास सुरुवात केली. विभागात शिवसेनेचे आंदोलन, सामाजिक उपक्रमात मोठा सहभाग असायचा. त्याच्या जोरावर महेश सावंत यांचा परिसरात चांगला जनसंपर्क तयार झाला. 


संबंधित बातमी:


Amit Thackeray: 'वरळी'चा समुद्रही साफ करुन देणार; अमित ठाकरेंच्या विधानाने पिकला हशा, नेमकं काय म्हणाले?


ठाकरे गटाकडून माहीममधून महेश सावंत निवडणुकीच्या रिंगणात, Video: