Agriculture News Urea : शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या अनुदानित युरियाचा काळाबाजार करुन तो उद्योगासाठी वापरणाऱ्या रॅकेटचा बीडच्या कृषी विभागाने पर्दाफाश केला आहे. आष्टी तालुक्यातील घाटापिंप्री येथे टाकलेल्या धाडीत हा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   दरम्यान, या तपासात मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. 


काळाबाजार कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी उघडकीस आणला


शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या युरियाची अनेकदा टंचाई जाणवते. यामागे होणारा काळाबाजार कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी उघडकीस आणला आहे. बीड-अहमदनगर रोडवर घाटापिंप्री शिवारात आबासाहेब शेळके यांच्या गोठ्याशेजारी असलेल्या खोलीची पाहणी केली असता त्या ठिकाणी युरियाच्या पन्नास भरलेल्या आणि रिकाम्या 744 बॅग आढळून आल्या. यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने तेथून जवळच असलेल्या खंडोबा वस्ती परिसरातील शरद घोडके यांच्या नव्याने बांधकाम झालेल्या इमारतीमध्ये असलेल्या साठ्याबाबत माहिती दिली. त्या ठिकाणी देखील पॅकींगचे साहित्य आढळून आले. या कारवाईत 1 लाख 40 हजार 689 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आबासाहेब शेळके याच्या विरोधात अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलिस करत आहेत.


प्लायवुड, पेंट इंडस्ट्रीसाठी वापर


शेतकऱ्यांसाठी येणारा युरिया हा अनुदानित असतो. शेतकऱ्यांना ही बॅग 266 रुपयांना मिळते. याची मुळ किंमत 2257 रुपये आहे. तर उद्योगाच्या वापरासाठी येणारा युरिया हा वेगळ्या पॅकींगमध्ये येतो, त्यावर कोणतेही अनुदान नसते. किंमतीत असलेल्या मोठ्या फरकामुळे याचा काळाबाजार करुन शेतकऱ्यांसाठी येणारा युरिया उद्योगासाठी पुरवण्याचा गोरखधंदा आष्टीत सुरु होता. हा युरिया प्लायवुड आणि पेंट इंडस्ट्रीसाठी पाठवला जात होता. आता हा प्रकार उघडकीस आल्याने सदर आरोपीने तो कोठून खरेदी केला आणि कोठे पाठवला, याबाबतची माहिती समोर येऊ शकणार आहे.


रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर


रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होत आहे. दिवसेंदिवस उत्पादकता आणि जमिनीचा पोत खराब होत आहे. याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. मात्र, याबाबत कुठलेही मार्गदर्शन अथवा सल्ला मिळत नसल्याने दिवसेंदिवस खतांचा वापर वाढत आहे, असेही काही शेतकऱ्यांचे म्हणने सुद्धा आहे. शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे, रासायनिक खतांचा अतिवापर जमिनीचा पोत बिघडू शकतो. त्यामुळं आवश्यक असल्यास तरच रासायनिक खतांची मात्रा द्यावी, अन्यथा सेंद्रिय शेती करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. महाराष्‍ट्रात देखील गेल्‍या दोन दशकांमध्‍ये रासायनिक खतांचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Fertilizer : खरीप हंगामात रासायनिक खतांचा वापर वाढला, केंद्रीय खत सचिवांनी सांगितली आकडेवारी; वाचा सविस्तर