Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांनी आज मोठे शक्ती प्रदर्शन करत माचनूर येथील महादेव मंदिरात आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या विराट सभेची सुरुवात झाली. विशेष म्हणजे कालच संध्याकाळी महाविकास आघाडीतील शरद पवार गटाचे उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचाराचा शुभारंभ माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते याच ठिकाणी झाला होता. काल मोहिते पाटील यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचे नाव न घेता गद्दार आला जनता धडा शिकवेल असा टोला लगावल्याने आज प्रणिती शिंदे आणि भगीरथ भालके याला काय उत्तर देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माचनुरचा महादेव कोणाला पावणार?
मंगळवेढा तालुक्यातील अतिशय पुरातन असणाऱ्या माचनूर येथील महादेव मंदिरात सर्व प्रमुख उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडल्याने माचनुरचा महादेव कोणाला पावणार? याचीही चर्चा मतदारसंघात रंगू लागली आहे. याच ठिकाणी भाजपचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांनी दोन दिवसांपूर्वी प्रचाराचा शुभारंभ केला होता. काल राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अनिल सावंत यांचा येथेच शुभारंभ झाला होता. आता आज याच ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचे भगीरथ भालके यांनी विराट शक्ती प्रदर्शन करीत आपल्या प्रचाराचा नारळ फोडला.
महाविकास आघाडीत झालेली बिघाडी कोणाला फायदेशीर?
तिन्ही उमेदवारांनी केलेल्या शक्ती प्रदर्शनामुळे पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची निवडणूक रंगतदार होणार असून या ठिकाणी महाविकास आघाडीत झालेली बिघाडी कोणाला फायदेशीर ठरते यावर येथील निकाल अवलंबून असणार आहे. महाविकास आघाडीतील लोकसभेला एकत्र असलेले माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे अनिल सावंत यांच्या प्रचारासाठी तर सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे या भगीरथ भालके यांच्या प्रचाराला आल्याने जिल्ह्यातील दोन्ही खासदार विधानसभेला एकमेकांच्या विरोधात असल्याचे चित्र तयार झाले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या