पंढरपूर: विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या घडामोडी राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. अशातच मोहिते पाटील कुटुंब आणि ढोबळे कुटुंब शरद पवार यांच्यापासून दूर जाण्यामागे आमचे एकच दुखणे होते आणि ते दुखणे दूर झाल्यावर आम्ही पुन्हा स्वगृही परतलो असा टोला खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांना लगावला आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी मोहिते पाटील यांनी हा उलगडा केला. यावेळी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिल सावंत, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या सक्षणा सलगर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनिल सावंत यांनी मोठे प्रदर्शन करीत ही जागा आपणच जिंकणार आणि 23 तारखेचा गुलाल आपलाच असणार असा दावा केला आहे. 


आपल्या भाषणात खासदार मोहिते पाटील यांनी अजित पवारांनाही लक्ष करताना, त्याच व्यक्तीने साहेबांना धोका दिल्या त्यामुळे बरेच व्यक्ती लांब गेले असाही टोला अजित पवारांना लगावला. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याने राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांच्या समोर का उभी राहिली याचा खुलासा करताना ज्या गद्दाराने हे केले त्याला वीस तारखेला धडा शिकवा असे आव्हान करताना राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्यावर निशाणा साधला. आम्हाला अचानक समजले की ही राष्ट्रवादीची जागेवर राष्ट्रीय काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला. वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारी ही त्याला देण्याचे संकेत दिले होते. मात्र, अचानक राष्ट्रीय काँग्रेसची एबी फॉर्म आणला. यानंतर त्याला संपूर्ण दिवसभर पवारांनी भेटण्यासाठी वेळ देऊ नये त्याने साहेबांना दगा दिला त्यांच्याशी गद्दारी केली आता अशा गटाराला जनता धडा शिकवेल असा इशारा राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचे नाव न घेता धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिला. 


भालके यांनी काँग्रेसची उमेदवारी आणल्यानंतर आपण उमेदवारी बदलून घेऊ आणि राष्ट्रवादीच्या जागेवर तुम्ही राष्ट्रवादी कडून उभारा अशा पद्धतीचे निरोप भालके यांना देण्यात आले होते. मात्र प्रत्येक वेळेला मदत करू नये त्यांनी साहेबांची भेट टाळली आणि इतक्या ज्येष्ठ माणसाला दगा दिला आता याचे उत्तर साहेबांवर प्रेम करणारी जनता देऊन गद्दाराला जागा दाखवील अशी सडकून टीका धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली. नंतर अनिल सावंत यांना दिलेली उमेदवारी ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर देण्यात आली. भालके न आल्यामुळे शेवटच्या क्षणाला अनिल सावंत यांना एबी फॉर्म दिला आणि ते रिंगणात उतरले असा खुलासा केला. या मागच्या नेमका गद्दार कोण आहे त्याचे नाव घेऊन मी पंढरपूरच्या सभेत याचा संपूर्ण उलगडा करेन असे सांगत संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांवर प्रेम करणारे मतदार हे अनिल सावंत यांना मोठ्या मताधिक्याने विजय करतील असा विश्वास व्यक्त केला. 


सध्या आपल्या नावाने सगळीकडेच बोंब चालू असून पंढरपूर-मंगळवेढा माढा माळशिरस ही तिकिटे आपणच कापल्याचा आरोप होत असला तरी आमचे सर्व उमेदवार विजयी होतील असा दावा त्यांनी केला. यानंतर एबीपी माझाशी बोलताना जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व उमेदवार विजयी होतील असे सांगताना महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणणे खासदार मोहिते पाटील यांनी टाळले. त्याचे कारणही तसेच असून महाविकास आघाडीमध्ये पंढरपूर मंगळवेढा व सांगोल्यात बिघाडी झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार विजयी होतील असा दावा त्यांना करावा लागला.