Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये चांगलीच राजकीय उलथापालथ सुरू आहे. नाशिकमध्ये शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी येवला विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघांमध्ये जाऊन त्यांनी थेट शड्डू ठोकला आहे. कांदेंच्या अपक्ष उमेदवारीने भुजबळ आणि कांदे यांच्या राजकीय वादामध्ये आणखी एक ठिणगी पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून भुजबळ आणि कांदे यांच्यामध्ये चांगलाच राजकीय वाद पेटला आहे. आता थेट येवला मतदारसंघांमध्येच कांदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.


समीर भुजबळांनी शड्डू ठोकला


दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्ष पदाचा राजीनामा देत समीर भुजबळ यांनी शिंदे गटाचे आमदार सुहास कांदेंविरोधात शड्डू ठोकला आहे. समीर भुजबळ नांदगाव मतदारसंघातून 28 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये आता ठिणगी पडली आहे. सुहास कांदे हे विद्यमान आमदार असल्याने महायुतीच्या जागा वाटपाच्या फाॅर्म्युलानुसार ही जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे गेली आहे. कांदे यांना अपेक्षेप्रमाणे उमेदवारी जाहीर होताच समीर भुजबळ यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या