Vidhasabha Election Nanded District MLa List : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhasabha Election) पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी बैठका, दौरे, संवाद सुरु केलाय. तसेच अनेक नवख्या उमेदवारांनी देखील मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात (Nanded District) देखील राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. आता विधानसभेच्या निवडणुकीत नेमकं काय होणार? याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. दरम्यान, सध्या नांदेड जिल्ह्यात कोणाचं वर्चस्व आहे? कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचा आमदार आहे, याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात. 


नांदेड जिल्ह्यात 9 विधानसभा मतदारसंघ आहेत. सुरुवातीच्या काळात हा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र, हळूहळू या जिल्ह्यात भाजपची ताकद वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देखील लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राज्याचे वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर नांदेड जिल्ह्यात देखील राजकीय समीकरणं बदलली आहेत. आता विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. या अनुषंगाने सध्या नांदेड जिल्ह्यात कोणत्या पक्षाचे किती आमदार आहेत? राजकीय समीकरणं काय आहेत? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात. 


नांदेड जिल्ह्यात कोणत्या पक्षाते किती आमदार (Nanded MLA List)


83) किनवट विधानसभा - भीमराव केराम (भाजप)
84) हदगाव विधानसभा - माधवराव पाटील जवळगावकर (काँग्रेस)
85) भोकर विधानसभा - अशोक चव्हाण (भाजप) - सध्या राज्यसभा खासदार 
86) उत्तर नांदेड विधानसभा - बालाजी कल्याणकर (शिवसेना - एकनाथ शिंदे)
87) दक्षिण नांदेड विधानसभा - दक्षिण मोहन हंबर्डे (काँग्रेस)
88) लोहा विधानसभा - श्यामसुंदर शिंदे (अपक्ष)
89) नायगाव विधानसभा - राजेश पवार (भाजप)
90) देगलूर विधानसभा -  जितेश अंतापूरकर (काँग्रेस)
91) मुखेड विधानसभा - तुषार राठोड (भाजप)


किनवट विधानसभा


किनवट विधानसभा मतदारंघात 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाने जिंकला होता. या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे भीमराव रामजी केराम विजयी झाले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदिप हेमसिंग जाधव यांचा 13272 मतांनी पराभव केला होता. 


हदगाव विधानसभा


2019 च्या विधानसभा निवडणुकीत हदगाव-हिमायतनगर मतदारसंघातून काँग्रेसचे माधवराव पाटील-जवळगावकर हे विजयी झाले होते. त्यांनी शिवसेनेचे विद्यमान आमदार नागेश पाटील-आष्टीकर यांचा परभाव केला होता. त्यामुळं हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे आला होता. माधवराव पाटील यांनी 12 हजार 500 मतांनी विजय मिळवला होता. त्यांच्यानंतर अपक्ष उमेदवार बाबूराव कोहळीकर यांना दोन नंबरची मते मिळाली होती. विद्यमान आमदार नागेश पाटील तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. 


भोकर विधानसभा


2019 मध्ये भोकर विधानसभा मतदारसंघ हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने जिंकला होता. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अशोक शंकरराव चव्हाण हे विजयी झाले होते. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या श्रीनिवास उर्फ ​​बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचा 97445 मतांनी पराभव केला होता. त्यानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर अशोक चव्हाण हे राज्यसभेवर खासदार झाले आहेत. 


उत्तर नांदेड विधानसभा


नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ 2019 मध्ये शिवसेनेने जिंकला होता. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे बालाजी देविदासराव कल्याणकर हे विजयी झाले होते. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दत्तात्रय पांडुरंग सावंत यांचा 12106 मतांच्या फरकाने पराभव केला होता. बालाजी कल्याणकर हे सध्या शिवसेना शिंदे गटात आहेत. 


दक्षिण नांदेड विधानसभा


नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा नांदेड लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघून काँग्रेसचे मोहनराव मारोतराव हंबर्डे हे 46,943 मते मिळवून विजयी झाले होते. त्यांनी भाजपचे उमेदवार दिलीप वेंकटराव कांडकूरते यांचा पराभव केला होता. हंबर्डे यांनी 3592 मतांनी कांडकूरते यांचा पराभव केला होता. 


लोहा विधानसभा


लोहा विधानसभा मतदारसंघात 2019 मध्ये भारतीय शेतकरी आणि कामगार पक्षाने जिंकला होता.  भारतीय शेतकरी आणि कामगार पक्षाचे श्यामसुंदर दगडोजी शिंदे हे विजयी झाले होते. त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या शिवकुमार नारायणराव नारंगळे यांचा 64362 मतांनी पराभव केली होती. 


नायगाव विधानसभा


2019 मध्ये नायगाव विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाने जिंकला होता. या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे राजेश संभाजीराव पवार हे जिंकून आले होते. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांचा 54384 मतांच्या फरकाने पराभव केला होता. 


देगलूर विधानसभा


2019 च्या विधानसभा निवडणुकीत देगलूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे रावसाहेब अंतापूरकर हे विजयी झाले होते. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार सुभाष साबणे यांचा 22 हजार मतांनी पराभव केला होता. मात्र, त्यानंतर काही दिवसांनी आमदार अंतापूरकर यांचं निधन झालं होतं. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती. यामध्ये रावसाहेब अंतापूरकर यांचे पुत्र जितेश अंतापूरकर हे 41 हजार 933 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या सुभाष साबणेंचा पराभव केला. 


मुखेड विधानसभा 


2019 मध्ये मुखेड विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाने जिंकला होता. या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे तुषार गोविंदराव राठोड यांनी विजय मिळवला होता. त्यांनी  भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे भाऊसाहेब खुशालराव पाटील यांचा 31863 मतांच्या फरकाने पराभव केला होता. 


महत्वाच्या बातम्या:


विधानसभेची खडाजंगी: भंडाऱ्यात 3 मतदारसंघ, आमदारांची यादी; जाणून घ्या सध्याची राजकीय स्थिती