नागपूर: आडनाव पायलट आणि विमानाची दिशाच जर चुकत असेल तर तुम्ही त्याला काय म्हणणार? होय, असंच काहीसं घडलंय काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्यासोबत. महाराष्ट्रात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आणि सभेसाठी देशभरातील नेते मंडळी सध्या राज्यात येत आहेत. सभा, प्रचार दौरे, रॅली करत आहेत. त्याचप्रमाणे काँग्रेस नेते सचिन पायलट देखील विदर्भात काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी आले होते, त्यावेळी सचिन पायलट यांचं हेलिकॉप्टर वैमानिकाच्या चुकीमुळे ते गोंदिया जिल्ह्यात लँड होण्याऐवजी गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरीमध्ये लँड झालं होतं. योगायोगाने आरमोरीमध्ये त्याच वेळेस काँग्रेस नेते कन्हैया कुमार हेलिपॅडवर येणा होते, मात्र, पुन्हा त्यांनी युटर्न घेतला आणि ठरलेल्या सभेच्या ठिकाणी पोहोचले.
नेमकं काय घडलं?
दोन दिवसांपूर्वी सचिन पायलट विदर्भात काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी आले होते. नागपुरातून सचिन पायलट हेलिकॉप्टरने गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनीसाठी निघाले. मात्र, वैमानिकाच्या चुकीमुळे ते गोंदिया जिल्ह्यात लँड होण्याऐवजी गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी मध्ये लँड झाले. मात्र, योगायोगाने आरमोरीमध्ये त्याच वेळेस काँग्रेसने ते कन्हैया कुमार हेलिपॅडवर येणे अपेक्षित होते. त्यामुळे आरमोरीमधील काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांच्या स्वागतासाठी तिथे तैनात होते. हेलिकॉप्टरमधून अचानक कन्हैया कुमार यांच्या ऐवजी सचिन पायलट समोर आल्याने आरमोरी मधील काँग्रेस नेते ही चकित झाले.
हेलिकॉप्टरमधून उतरल्यावर सचिन पायलट आणि त्यांच्या वैमानिकाला आपण वेगळ्याच ठिकाणी लँड झाल्याची चूक लक्षात आली. सचिन पायलट यांनी आरमोरीमधील काँग्रेस नेत्यांशी बातचीत केली आणि तिथून ते गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनीसाठी रवाना झाले. चुकीच्या लँडिंगच्या या घटनेमुळे सचिन पायलट मोरगाव अर्जुनीच्या सभेत सुमारे तीन तास उशिरा पोहोचले आणि पायलट यांच्या सभेला उशीरा सुरुवात झाली.
चुकीच्या लँडिंगची सचिन पायलट यांची कबुली
त्याचबरोबर गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनीमधील सभेत सचिन पायलट यांनी भाषणात मान्य केले की, त्यांच्या हेलिकॉप्टर पायलटने त्यांना चुकीच्या ठिकाणी उतरविले होते. त्यामुळे त्यांना सभेत येण्यासाठी उशीर झाला. भाषणावेळी बोलताना सचिन पायलट म्हणाले, 'उशीर झाला त्यासाठी तुम्हा सर्वांची मी क्षमा मागतो. आमच्या हेलिकॉप्टरने आम्हाला दुसऱ्याच ठिकाणी उतरवलं होतं. दुसऱ्या सभेच्याच ठिकाणी हेलिकॉप्टरने आम्हाला उतरवलं, त्यानंतर पुन्हा इकडे येण्यासाठी आम्हाला उशीर झाला. हे निवडणुकांच्या दरम्यान होतंच. मात्र, मला इथं पोहचायला उशीर झाला त्यासाठी मी तुमची पुन्हा क्षमा मागतो, या निवडणुकीच्या अनुषंगाने मला माझ्या मनातल्या गोष्टी तुम्हाला सांगता आल्या आणि तुमचे आशीर्वाद घेण्याची संधी मला मिळाली', असंही पुढे सचिन पायलट यांनी म्हटलं आहे.