मुंबई महायुतीचे (Mahayuti)  उमेदवार एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार फायनल करत असले, तरी जागावाटपाचा निर्णय मात्र दिल्लीतच फायनल होतो. मात्र यंदा दिल्ली हायकमांडला देखील पेच सोडवताना कठीण जातंय. अमित शाहांच्या घरी तब्बल तीन तास बैठक चालली. काही जागांचा तिढा सुटला असला तरी काही जागांचं घोडं मात्र अजून अडलेलंच आहे.. अमित शाहांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नेमकं काय काय झालं जाणून घेऊया 

गुरूवारी  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अमित शाहांच्या घरी पोहोचले. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंची तासभर अमित शाहांसोबत नेमकी काय खलबतं झाली माहीत नाही. तासाभराच्या अंतरानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील बैठकीसाठी आले.   तब्बल तीन साडे तीन तासांनंतर ही बैठक संपली. या बैठकीच्या इनसाईड स्टोरीपेक्षा, ही मीटिंग एक दिवसानं कशी पुढे ढकलली गेली हे त्यापेक्षा जास्त इंट्रेस्टिंग आहे.

बैठक एक दिवस पुढे का ढकलली?

दुसऱ्या टप्प्यातील रखडलेल्या जागावाटपावर चर्चा करण्यासाठी, दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार बुधवारीच दिल्लीत पोहोचले. प्रतीक्षा होती ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची.. कामाख्या देवीचं दर्शन, मग सिंधुदुर्गात निलेश राणेंचा पक्षप्रवेश असा कार्यक्रम आटपून शिंदे दिल्लीला येणार होते. मात्र एकाएकी एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा रद्द झाला. विशेष म्हणजे दिल्लीत अजितदादांसोबत पोहोचलेल्या सुनील तटकरेंना ही बातमी देखील माध्यमातून कळाली.  मिसकम्युनिकेशन म्हणायचं की असमन्वय अशी चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.  अखेर गुरूवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  बैठकीसाठी दिल्लीला पोहोचले . 

भाजपानं 99,  अजित पवारांनी - 38 तर एकनाथ शिंदेंनी- 45  उमेदवार जाहीर केले आहेत. महायुतीत 30 जागांवरचा तिढा कायम होता. मात्र अमित शाहांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत काही जागांचं कोडं सुटलंय

कुठे अडलं, कुठलं गणित सुटलं? 

  • वसई, विरार, पालघर आणि भोईसर या जागा सोडण्याची तयारी भाजपानं दाखवली. तर नालासोपारा मतदारसंघ भाजपनं स्वतःकडे ठेवलाय. 
  • आष्टी, वडगाव शेरी आणि तासगाव या जागांवरून भाजप आणि राष्ट्रवादीत घासाघीस सुरू आहे.
  • याशिवाय नवाब मलिकांच्या उमेदवारीवर अमित शाहांसोबतच्या बैठकीत काय ठरलं याचा सस्पेन्स कायम आहे

लोकसभेप्रमाणे विधानसभेतही भाजपानं जास्त जागांचा अट्टाहास धरल्याचं कळतंय. लोकसभेला सर्व्हेच्या मुद्द्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेनं काही जागा सोडल्या. मात्र यावेळी एकनाथ शिंदे यांनी काहीशी ताठर भूमिका घेतल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलंय. विधानसभेच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता वाढल्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा दावा आहे. लोकसभेप्रमाणे भूमिका घेतली तर नुकसान होऊ शकतं असा शिंदेंच्या शिवसेनेचा निष्कर्ष आहे.

जागावाटपाच्या चर्चेशिवाय भाजपाचे चाणक्य अर्थात अमित शाहांनी महायुतीला कानमंत्र दिला आहे.

  • नाराज उमेदवारांची तुम्ही सगळ्या प्रकारे समजूत काढा
  • बंडखोरांवर राज्यातील भाजपच्या नेत्यांनी नियंत्रण ठेवावं
  • महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आणण्यासाठी एकत्र काम करा

हा सल्ला देण्यामागचं कारण म्हणजे महायुतीमध्ये वाढलेले बंडोबा कारण महायुतीला बंडखोरांचं टेन्शन आले आहे.  

उमेदवार         बंडखोर
अर्जुन खोतकर   शिवसेना (शिंदे)      भास्कर दानवे (भाजप)
सुहास कांदे  (शिवसेना शिंदे)  समीर भुजबळ राष्ट्रवादी(अजित पवार)
कृष्णा खोपडे   (भाजप )   आभा पांडे  राष्ट्रवादी (अजित पवार)
मंदा म्हात्रे     (भाजप )         विजय नाहटा ( शिवसेना शिंदे)
 राजेश पाटील   (राष्ट्रवादी  अजित पवार) शिवाजी पाटील (भाजप)
 सुनील शेळके  (राष्ट्रवादी अजित पवार)  बाळा भेगडे (भाजप)
नरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी अजित पवार) धनराज महाले  (शिवसेना शिंदे)

  राजकारणात खरा शत्रू हा प्रतिस्पर्ध्यापेक्षा घरातला किंवा आजूबाजूचा असतो असं म्हणतात. महायुतीमध्ये जागावाटप कशाप्रकारे होतं आणि कुणाला तिकीट दिलं जातंय यावरून घरातल्या शत्रूंची संख्या ठरणार आहे. या शत्रूंना रोखण्याचं आव्हान शिंदे, फडणवीस आणि अजितदादांसमोर असणार आहे.

हे ही वाचा :

शिवडीतले शिवसैनिक भडकले, राजीनामा देण्याच्या तयारीत,सुधीर साळवी लवकरच घेणार महत्वाचा निर्णय