मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या यादीत 65 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. यामध्ये मुंबईतील 36 पैकी 13 जागांवर ठाकरेंनी उमेदवार दिले होते. मात्र, पहिल्या यादीत शिवडी मतदारसंघाचा समावेश नव्हता. कारण, या मतदारसंघातून ठाकरेंकडे विद्यमान आमदार अजय चौधरी आणि शिवसेनेचे शिवडीतील पदाधिकारी सुधीर साळवी इच्छुक होते. आज मातोश्री निवासस्थान येथे झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी सेनेतील फुटीवेळी अजय चौधरी सोबत राहिल्याचा दाखला देत उमेदवारी बाबत निर्णय घेतला. या निर्णयानंतर सुधीर साळवी बैठकीतून बाहेर निघून गेले. मातोश्रीवरुन निघताना सुधीर साळवी यांना माध्यमांना प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, त्यांनी एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून काम करणार असल्याचं जाहीर केलं होतं. 


सुधीर साळवींचे कार्यकर्ते नाराज


शिवडी विधानसभेत अजय चौधरी यांना तिकिट दिल्यानंतर सुधीर साळवी यांचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत, सुधीर साळवी या उमेदवारीच्या रेसमध्ये होते पण तिकिट नाकारल्यानं कार्यकर्त्यांनी शाखेबाहेर मोठी गर्दी केली होती. सुधीर साळवींनी भूमिका घ्यावी आणि निवडणूक लढवावी अशा मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. 


विशेष बाब म्हणजे सुधीर साळवींच्या समर्थकांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे तर दुसरीकडे अजय चौधरी यांना तिकीट दिल्यानंतर त्यांचे मोजकेच कार्यकर्ते आनंद साजरा करताना दिसत होते. सर्व कार्यकर्त्यांची गर्दी ही सुधीर साळवींकडे दिसत होता त्यामुळे शिवडीत सध्या उद्धव ठाकरेंनी धेतलेला निर्णयाबद्दल नाराजी दिसत आहे. 


सुधीर साळवी उद्या निर्णय घेणार


महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवडीच्या जागेवरुन उमेदवारी अर्ज दाखल करायचा की नाही. ठाकरेंच्या निर्णयानंतर पुढची वाटचाल कशी असणार याबाबतचा निर्णय सुधीर साळवी घेणार आहेत. साळवी यांना उमेदवारी न मिळाल्यानं त्यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून सुधीर साळवी काय निर्णय घेतात याकडे शिवडी मतदारसंघातील मतदारांचं लक्षं लागलं आहे. 


मुंबईत मविआचे किती उमेदवार जाहीर?


महाविकास आघाडीनं संयुक्तपणे निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं आहे. त्यानुसार महाविकास आघाडीचे घटकपक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेनं पहिल्या यादीत 65 उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. तर, दुसरीकडे काँग्रेसनं 48 आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं 45 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यासोबत राहिलेल्या आमदारांना पुन्हा रिंगणात उतरवलं आहे. महाविकास आघाडीनं आतापर्यंत 158 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत.


इतर बातम्या :


ठाकरेंचे उमेदवार ठरले, नितेश अन् निलेश राणेंविरोधात कोण? नारायण राणेंच्या कट्टर विरोधकांना तिकीट