Mahant Sunil Maharaj On Uddhav Thackeray: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Vidhansabha Election 2024) घोषणा झाल्यानंतर राज्यातील सर्व राजकीय पक्ष जोरादार कामाला लागले आहेत. महायुतीमधील भाजप आणि शिवसेना (शिंदे गटाकडून) उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून अद्याप कोणीही उमेदवारांची यादी जाही केलेली नाही. तसेच जागावाटपावरुन ठाकगे गट आणि काँग्रेसमध्ये वाद देखील झाल्याची माहिती समोर येत होती. परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सर्व काही आलबेल असल्याचं वारंवार सांगितलं. आज ठाकरे गटाची पहिली उमेदावारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र याआधीच उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मोठा धक्का बसला आहे.
वाशिमधील बंजारा समाजाचे पोहरदेवीचे महंत सुनील महाराज यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम केला आहे. पक्षात वेळ आणि न्याय दिल्या जात नसल्याने सुनील महाराज यांनी एका पत्राद्वारे हे आपलं म्हणणं मांडलं आहे. 10 महिन्यात 10 मिनिटं वेळ मिळत नसल्याची खंत व्यक्त करत सुनील महाराज यांनी राजीनामा दिला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला हा सगळ्यात मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.
महंत सुनील महाराज काय म्हणाले?
उद्धव ठाकरे साहेब, सस्नेह जय महाराष्ट्र ! आपण शिवसेना पक्ष प्रमुख आणि राष्ट्रीय स्तरावर आघाडीचे प्रमुख नेते म्हणुन कार्य करत आहेत त्याबद्दल सर्वप्रथम महंत या नात्याने आशीर्वाद सोबतच एक शिवसैनिक म्हणुन हृदयस्पर्शी हार्दिक शुभेच्छा. आपण कोरोना काळातील अतिसंवेदनशील परिस्थितीत केलेली उल्लेखनीय कामगिरीची नोंद जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे. ही बाब सर्व भारतीय आणि खास करुन महाराष्ट्रातील जनतेसाठी गौरवाची आहे. त्याच बरोबर आपण शेतकरी व सर्वसामान्य जनतेला दिलेले प्रेम आणि न्याय नात्याने महाराष्ट्र राज्यातील जनतेने आपल्याला कुटूंब प्रमुखाची उपमा दिली आहे. शिवसेना पक्ष बळकट व्हावा म्हणुन मी महंत या नात्याने आपणास आशीवार्द सोबतच पक्षाला माझ्या परिने मदत व्हावी म्हणून माझी प्रमाणिक जबाबदारी जाणुन मी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला होता. शिवसेना पक्षाचा कार्यकर्ता म्हणुन पक्ष वाढीसाठी संघटन स्तरावर काम करण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या एक वर्षापासुन संघटन स्तरावर काम करण्यासाठी आपल्याकडुन आदेश आणि सुचनाची वाट पाहत आहे. आपण 9 जुलै 2023 ला बंजारा समाजाची काशी पोहरादेवी येथे दर्शनाकरीता आले होते व फेब्रुवारी 2024 ला जनसंवाद यात्रे निमित्त कारंजा व वाशिम येथे आले होते. ती भेट सोडुन आतापर्यंत आपली दहा मिनीटाची भेट घेण्याकरीता सातत्याने प्रयत्न करत आहे. परंतु आपल्याकडुन दहा मिनीट भेटीसाठी वेळ दिली जात नाहीत. त्याबद्दल थोड शल्य वाटत आहे.
....यावरुन माझी आपल्या पक्षाला काहीच गरज नाही असे सिध्द होते- महंत सुनील महाराज
कादाचित आपल्या व्यस्त कार्यामुळे आपण वेळ देणे शक्य होत नसेल हे सुध्दा मला मान्य आहेत. मी मागील दहा महिन्यापासुन मातोश्री वर भ्रमणध्वनीद्वारे कार्यालयात आणि रवि म्हात्रे यांना संपर्क करत आहे. भेटीसाठी आपणास सुध्दा काही मॅसेजेस केले होते, तरी सुध्दा दखल घेतली जात नाहीत. माझ्याकडून पक्षात काही नवीन कार्यकर्त्याला प्रवेशची यादी दिली होती. त्या कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश झाला आहे. या पक्ष प्रवेशासाठी मला निमंत्रण सुध्दा देण्यात आले नाही. साहेब मला पक्षाचे कार्य करायचे आहेत. पक्षाने मला तिकीट दिली पाहिजे हा माझा पुर्ण आणि अंतिम उद्देश किंवा मानस नाहीत. पक्षप्रमुख या नात्याने आपल्याला काही कटु निर्णय घ्यावे लागतात, हे मी समजु शकतो. परंतु संत सेवालाल महाराज, संत बाबनलाल महाराज यांचे वंशज व बंजारा समाजाचे धर्मपिठाच्या महंतला जर आठ ते दहा महिन्यापासुन भेटीची वेळ मिळत नसेल तर यावरुन माझी आपल्या पक्षाला काहीच गरज नाही असे सिध्द होते. म्हणून मी अतिशय जड अंतः करणाने आज माझा शिवसेना पक्षाचा राजीनामा आपल्याकडे या पत्राद्वारे सादर करीत आहे.