बुलढाणा: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाकडून मंगळवारी रात्री 45 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आता शिंदे गटात (Shivsena Shinde Camp) बंडाचे पहिले निशाण फडकले आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील (Buldhana Vidhan Sabha) इच्छूक प्रेमलता सोनावणे यांनी उमेदवारी न मिळाल्यामुळे अपक्ष लढणार असल्याचे जाहीर केले आहे.
काल रात्री शिवसेनेची उमेदवारांची यादी जाहीर झाली होती. यामध्ये बुलढाण्यातून शिंदे गटाचे फायरब्रँड संजय गायकवाड यांना उमेदवारी मिळाली तर मेहकर मधून डॉक्टर संजय रायमुलकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे . बुलढाणा जिल्हा हा राजमाता जिजाऊंचा जिल्हा आहे आणि त्यामुळे बुलढाणा मतदारसंघ हा शिंदेंच्या शिवसेनेने महिलांसाठी राखीव ठेवावा अशी सुरुवातीपासूनच मागणी करत शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला नेत्या प्रेमलता सोनवणे यांनी बंडाचे निशाण फडकवलं होते. मात्र, पक्षाने त्यांची दखल न घेतल्याने आता त्यांनी पक्षाविरोधातच बंडखोरी करण्याचं ठरवलं असून त्या आता शिवसेनेचे विद्यमान संजय गायकवाड यांच्या विरोधात बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे काल वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांचे भेट नाकारल्याने त्यांनी या घटनेचा निषेधही केला होता.
कोण आहेत प्रेमलता सोनवणे ?
प्रेमलता सोनवणे हे नाव अख्ख्या महाराष्ट्रात दारूबंदीसाठी आंदोलनामुळे गाजले होते. डबल ग्रॅज्युएट असलेल्या प्रेमलता सोनवणे या उच्चशिक्षित असून राज्यात दारूबंदीसाठी त्यांनी अनेक आंदोलन केलेली आहेत. 2012 झाली नागपूर येथील विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान त्यांचं मुंडन आंदोलन राज्यभरात गाजलं होतं. दलित , आदिवासी , अत्याचार पीडित नागरिकांना प्रेमलता सोनवणे यांनी आपल्या अस्तित्व संघटनेमार्फत मोठा दिलासा दिलेला आहे.
बुलढाणा जिल्ह्यात जवळपास सर्वच तालुक्यात प्रेमलता सोनवणे यांचे कार्यकर्ते व समर्थक आहेत. बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मोताळा तालुक्यातच त्यांचं माहेर व सासर दोन्ही आहेत. मराठा समाजातर्फे त्यांना मोठा पाठिंबाही मोताळा तालुक्यातून मिळत आहे.
गेल्या वर्षभरापासून प्रेमलता सोनवणे यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी सुद्धा सुरू केली आहे. बुलढाणा मतदार संघ बुलढाणा आणि मोताळा असे दोन तालुके मिळून तयार झालाय. यात मोताळा तालुक्यात प्रेमलता सोनवणे यांचं वर्चस्व आहे. आता बुलढाणा विधानसभा मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेतच बंडखोरी बघायला मिळत आहे. प्रेम लता सोनवणे या उद्या म्हणजे गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्यामुळे बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झालेली आहे.
आणखी वाचा
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची पहिली उमेदवार यादी समोर, विद्यमान आमदारांना पुन्हा संधी, 45 नावं जाहीर