Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी कोल्हापुरात येऊन अंबाबाईचे दर्शन घेण्याचा पॅटर्न कायम शिवसेनेचा दोन्ही गटांकडून केला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोल्हापूरमध्ये मंगळवारी 5 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. त्यामुळे एकाच दिवशी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात असणार आहेत. त्यामुळे मंगळवार कोल्हापूरसाठी राजकीय रणधुमाळीचा दिवस असणार आहे.


उद्धव ठाकरे 5 नोव्हेंबर रोजी कोल्हापुरात


राज्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट फाईट असून तिसरी आघाडीसुद्धा रिंगणात आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा स्वबळावर नशीब आजमावत आहे. थेट मुकाबला मात्र महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आहे. उद्धव ठाकरे 5 नोव्हेंबर रोजी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडणार आहेत.  उद्धव ठाकरे यांच्यावर काही दिवसांपूर्वीच अॅजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी मातोश्री आराम करतच तिकीट वाटपासह पक्षप्रवेश करून घेतले होते. त्यानंतर आता उद्धव ठाकरे कोल्हापूरमध्ये प्रचाराचा नारळ फोडणार आहेत.


कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना ठाकरेंच्या वाट्याला अवघ्या दोन जागा आल्या असून दोन माजी आमदारांनी सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला आहे. राधानगरीमधून केपी पाटील यांनी मशाल हाती घेतली आहे. शाहुवाडीतून सत्यजित पाटील रिंगणात आहेत. माजी आमदार उल्हास पाटील, सुजित मिणचेकर यांनी  स्वाभिमानीत प्रवेश केला आहे.


तपोवन मैदानात महायुतीची सभा होणार


दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा मंगळवारी कोल्हापूरमध्ये असणार आहेत. महायुतीची तपोवन मैदानात जाहीर रॅली होणार आहे. या रॅलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचाराचा नारळ फोडतील. 1995 मध्ये सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांनी प्रचाराचा शुभारंभ कोल्हापूरमधूनच केला होता. करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी गांधी मैदानामध्ये विराट सभा घेतली होती. 


शिंदे आणि सतेज पाटलांचा सामना रंगला 


दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यामध्ये चांगलांच कलगीतुरा रंगला आहे. कोल्हापूर उत्तरच्या काँग्रेस आमदार जयश्री जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर सतेज पाटील यांनी सुरत गुवाहाटीनंतर कोल्हापूरमध्ये प्रयोग झाल्याची खोचक टीका केली होती. यानंतर शिंदे गटाकडून माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले.   


दिवाळी संपताच प्रचाराचा धुरळा उडणार असून एकनाथ शिंदे कोल्हापुरात आल्यानंतर सतेज पाटील यांच्यावर आणि कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील घडामोडींवरून काय बोलणार याची सुद्धा उत्सुकता असेल.  


इतर महत्वाच्या बातम्या