इंदापूर: इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत आप्पासाहेब जगदाळे यांचे काही इतर नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याच पक्षप्रवेशावरून अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांचा चिमटा काढला. हर्षवर्धन पाटलांसोबत कोणीतरी राहू द्या नाहीतर लगेच प्रचार करतील असं अजित पवारांनी म्हटलं. आता अजित पवार यांच्या या टीकेला हर्षवर्धन पाटलांनी उत्तर दिलं आहे. अजित पवार यांनी माझी आणि माझ्या कार्यकर्त्यांची जी मनापासून काळजी घेतली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. कोण कोणाबरोबर राहिलं आणि कोण काय करणार आहे हे उद्याच्या 23 तारखेला निकाल लागल्यानंतर समजेल, असं हर्षवर्धन पाटलांनी म्हटलं आहे.
मला एकटं पाडण्याचा, कॉर्नर करण्याचा प्रयत्न केला जात आहे, तीस-पस्तीस वर्षाच्या राजकारणात अनेकांना मी मोठे केलं. ते आज ऐन निवडणुकीच्या तोंडावर सोडून जात आहेत. पण तालुक्यातील जनता उघड्या डोळ्यांनी बघत असून मतदार हुशार आहे. निकालातून जनता चोख उत्तर देईल असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणालेत हर्षवर्धन पाटील?
अजित पवारांना उत्तर देताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, त्यांच्या वक्तव्याची फार काही दखल घेण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. कारण की इथे आल्यानंतर इंदापूर तालुक्यातील जनतेने ठरवलेलं आहे ते आलेत म्हणजे काहीतरी बोलणारच आहेत त्यामुळे त्यांच्या वक्तव्याची फार काही दखल घेण्याची गरज नाही आणि कोण-कोणाबरोबर राहील आणि कोणाचा विजय होईल हे लवकरच कळेल. घोडा आणि मैदान लांब नाही त्यामुळे इंदापूर तालुक्यातील स्वाभिमानी जनता आहे त्यांनी हे सर्व चाललेलं पाहिलंय आयाराम गयाराम चा जो कार्यक्रम सुरू आहे त्याबाबत लोक विचारतात. गेल्या 30-35 वर्षापासून मी राजकारणात आहे काही लोकांना मी पद दिली. काही लोकांना आम्ही सन्मान दिला काही लोकांना आम्ही समाजापुढे आणलं त्यांना मोठेपणा दिला त्यांना मानसन्मान दिला त्यांना इतकं सगळं दिल्यानंतर आई निवडणुकीच्या तोंडावर ही माणसं आम्हाला सोडून जातात नाही. ते कशासाठी गेलेले आहेत कारण आता उमेदवारीचा प्रश्न संपलेला आहे उमेदवारी फायनल झालेली आहे. मग हा आयाराम गयारामचा जो कार्यक्रम आहे तो कशासाठी असा सवाल यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केलाय.
पुढे बोलताना ते म्हणाले ज्या माणसाला तुम्ही विरोध करत होता त्याच माणसाला आता म्हणता आम्ही मदत करणार हे गणित मला तरी समजले नाही मात्र यातून एक दिसून येतं इंदापूर तालुक्यातील जनता उघड्या डोळ्यांनी या सगळ्या घटना बघत आहे मला एकटा पाडण्याचा प्रयत्न केला जातोय राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे आता काही शिल्लक राहिलेला नाही माझ्याबद्दल बोलायला म्हणून आता माझ्या कुटुंबाबद्दल बोललं जात आहे माझ्या मुलांबद्दल बोललं जात आहे माझ्या मुलीबद्दल बोलले जात आहे. ही संस्कृती इंदापूर तालुक्याची नाही. इंदापूर तालुक्यातील जनता ही माझं दैवत आहे आणि मला विश्वास आहे इंदापूर तालुक्यातील स्वाभिमानी जनतेला हे आवडले नाही याचे उत्तर जनता लवकरच त्यांना देईल.