ठाणे : विधानसभेच्या निवडणुकीचा (Vidhan Sabha Election 2024) प्रचार सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. या निवडणुकीसाठ 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागेल. दरम्यान, या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोपरी पाचपाखाडी (Kopri Pachpakhadi) हा मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. येथेून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाने केदार दिघे यांना तिकीट दिलं आहे. याच केदार दिघे यांच्यावर एकनाथ शिंदे यांनी एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत टीका केली. 


केदार दिघे आनंद दिघे यांच्यासोबत...


कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघातून स्वत: एकनाथ शिंदे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात केदार दिघे यांच्या रुपात त्यांच्यापुढे प्रमुख आव्हान असेल. यावरच शिंदे यांना एबीपी माझाने बोलतं करण्याचा प्रयत्न केला. केदार दिघे हे आडनाव असलेला उमेदवार विरोधात उभा असताना निवडणूक लढवताना कसं वाटतंय, असं त्यांना विचारण्यात आलं. त्यावर बोलताना "आनंद दिघे आणि केदार दिघे यांच्यात जमीन-आसमानाचं अंतर आहे. आनंद दिघे हे आमचे गुरुवर्य आहेत. त्यांचाच आदर्श घेऊन मी पुढे चाललो आहे. मला तेव्हा केदार दिघे आनंद दिघे यांच्यासोबत कधीच दिसला नाही. आडनावाने काही फरक पडत नाही," असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. 


मी गेल्या अनेक वर्षांत....


तसेच, "मी एकनाथ शिंदे काम करतोय. मी लोकांना भेटतोय. गेल्या अनेक वर्षांत मी लोकांच्या संकटात धावून गेलोय. एवढ्या वर्षाचा जिव्हाळा निर्माण झाला आहे. लोक हे विसरणार नाहीत," असंही एकनाथ शिंदे म्हणाले. 


एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची निवडणूक


एकनाथ शिंदे ज्या आनंद दिघे यांना आपले राजकारणातील गुरु मानतात त्याच आनंद दिघे यांचा पुतण्या शिंदे यांच्याविरोधात उभा आहे. त्यामुळे आता कोपरी पाचपाखाडीतील विजय एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेचा झालेला आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या कोणत्याही बड्या नेत्याची सभा झालेली नाही. पण ही जागा जिंकण्यासाठी उद्धव ठाकरे तसेच केदार दिघे यांनी पूर्ण ताकद लागवली आहे. त्यामुळे आगामी काळात नेमकं काय होणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. 


हेही वाचा :


Eknath Shinde: भाजपसोबत का गेलो? एकनाथ शिदेंनी सांगितलं कारण, म्हणाले, 'मी ठाकरेंना सांगत होतो..... '


Sharad Pawar Speech: शरद पवार 'बटेंगे तो कटेंगे' आणि 'लाडकी बहीण'चं नरेटिव्ह कसं कापतायत? भाषणांमधील दोन फॅक्टर्सची जोरदार चर्चा


शरद पवारांच्या सांगता सभेकडे अख्ख्या देशाचं लक्ष, बारामतीत शेवटच्या सभेत काय घोषणा करणार? अजितदादा चितपट होणार?