सिंदखेड राजा: सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारांच्या पक्षात शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर सिंदखेडराजा मतदार संघात उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काल (शनिवारी) डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर घेण्यात आलेल्या जाहीर सभेत डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार असलेले प्रा. नरेंद्र खेडेकर यांची भर सभेत माफी मागितली. माफी मागताना डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले की, "मी नरेंद्र खेडेकर यांची माफी मागतो! आज मी घेतलेला निर्णय जर चार ते पाच महिन्यांपूर्वी घेतला असता तर आज प्रा. नरेंद्र खेडेकर हे खासदार म्हणून निवडून गेले असते. मात्र ते दिवस आता निघून गेलेत आता मी काम करून व्याजासकट त्याची भरपाई करेल.
डॉ.राजेंद्र शिंगणे हे सिंदखेड राजा मतदारसंघातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. त्यांनी अलीकडेच अजित पवार गटातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रा नरेंद्र खेडेकर यांच्या विरोधात महायुतीच्या उमेदवारासोबत डॉक्टर राजेंद्र शिंगणे होते.
काय म्हणाले डॉ.राजेंद्र शिंगणे?
भर सभेत बोलताना डॉ.राजेंद्र शिंगणे म्हणाले, आज खंत फक्त एका गोष्टीची वाटते, हा निर्णय पाच ते सहा महिन्यांपुर्वी झाला असता तर, नरेंद्र खेडेकर खासदार असते. नरू भाऊ, माफी मागतो, चूक झाली, पण आता त्याला काही पर्याय नाही पण,भविष्यात जर कधी मोठी संधी मिळाली, तर व्याजासकट या गोष्टीची भरपाई करून देऊ, हे तुम्हाला मी आज सांगतो.
आपल्याच काकांच्या विरोधात गायत्री शिंगणे बंडाच्या तयारीत
एकीकडे राजेंद्र शिंगणे यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश झाला असताना दुसरीकडे शिंगणे यांची पुतणी गायत्री शिंगणे नाराज आहे. आपल्याच काकांच्या विरोधात गायत्री शिंगणे बंडाच्या तयारीत आहे. गायत्री शिंगणे अपक्ष राजेंद्र शिंगणेच्या विरोधात निवडणूक लढणार असल्याची माहिती आहे. याबाबतची माहिती गायत्री शिंगणे यांनी एबीपी माझाला दिली आहे. गद्दारी करुन गेलेल्या राजेंद्र शिंगणे यांना पक्षात घेणं चुकीचं असल्याचे गायत्री शिंगणे म्हणाल्या.