पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली, पक्षात दोन गट पडले, त्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. यादरम्यान अनेकदा अजित पवारांनी शरद पवारांच्या वयाचा उल्लेख करत त्यांनी निवृत्ती घ्यावी असं म्हटलं होतं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांच्या वयाचा उल्लेख करत टीका केली होती. वय झालं तरी ते निवृत्त होत नाहीत. कधी निवृत्त होणार? घरी बसावं ना. मार्गदर्शन करावं, असं विधान अजित पवार यांनी वारंवार केलं होतं. त्यानंतर आज त्यांचं ते वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. त्याच कारण म्हणजे दिलीप वळसे आणि अजित पवारांच्या वक्तव्यात विरोधाभास दिसून आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.


काय म्हणाले दिलीप वळसे पाटील?


मी सात वेळा आमदार झालो, आठव्यांदा कशाला. आता मला सांगा घरातील वडीलधारी मंडळी किती ही मोठी झाली तर आपण त्यांना बाजूला करतो का? आपण त्यांचा सांभाळ करतोच. मात्र सत्तेच्या हव्यासापोटी विरोधक असे आरोप करतायेत, असं आंबेगाव मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे विद्यमान आमदार आणि विधानसभेचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी बोलताना म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने आता विरोधाभास निर्माण झाला आहे.


एकीकडे शरद पवारांचे वय झालं आहे, आता त्यांनी आम्हाला संधी द्यावी. वडील कधी न कधी मुलांच्या हातात कारभार देतातचं, असं अजित पवार वारंवार म्हणतात. मात्र दिलीप वळसेंनी विरोधात उभं राहणाऱ्यांना उद्देशून बोलताना मात्र, हव्यासापोटी आपण वडीलधाऱ्यांना कधी बाजूला करतो का? असं वक्तव्य केलं आहे. अजित पवार आणि दिलीप वळसेंच्या वक्तव्यातून हा विरोधाभास दिसून आला. त्यामुळे अजित पवारांचे शरद पवारांच्या बाबतीत केलेलं ते वक्तव्य चर्चेत आलं आहे. 


चार दिवस सासूचे, तसे चार दिवस सुनेचे


काही दिवसांपुर्वी पुणे जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असताना चार दिवस सासूचे तसे चार दिवस सुनेचेही असतात की नाही? का त्या सुनेने म्हातारी होईपर्यंत फक्त बघतचं राहायचं. असा प्रश्न उपस्थित करत, अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधला होता.


माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही - दिलीप वळसे


 यंदाच्या विधानसभेत परिस्थिती बदललेली आहे. मात्र माझ्या समोर कोणतंही आव्हान नाही. असा विश्वास आंबेगाव विधानसभेत अर्ज दाखल करताना दिलीप वळसे पाटलांनी व्यक्त केलाय. मी विकासाच्या मुद्द्यावर लढतोय, त्यामुळं विरोधकांवर भाष्य करण्याची मला गरज नाही. मी त्यांच्या आरोपांची उत्तर देणार नाही. अशी भूमिका ही वळसेंनी घेतली.