पुणे: महाराष्ट्रातील 288 विधानसभेच्या जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. काही मतदारसंघामध्ये तगडी लढत होणार आहे. काही मतदारसंघामध्ये गोंधळ होताना दिसत आहेत, काही ठिकाणी पक्षातील कार्यकर्ते आपापसात भिडताना दिसत आहेत. अशातच पिंपरीत गोपनीयतेचा भंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे उमेदवार अण्णा बनसोडे यांना मतदान केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्याचं दिसून येत आहे.
निवडणुकीमध्ये मतदानाची गोपनीयता राखण्यासाठी निवडणूक आयोगाने कठोर नियम बनवले आहेत. मात्र, तरीही पिंपरी विधानसभेतील मतदान केंद्रावर ही गोपनीयतेचा भंग झालाचा प्रकार समोर आला आहे. एका मतदाराने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार अण्णा बनसोडेंना मतदान केल्याचं मोबाईलमध्ये कैद केलं आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची हिंमत देखील केली. यामुळे निवडणूक यंत्रणा आणि पोलिसांच्या भूमिकेवर ही संशय निर्माण झाला आहे. सत्ताधारी उमेदवारांना मतदान केल्याचे व्हिडीओ व्हायरल होत असल्यानं निवडणूक यंत्रणेवर शंका ही उपस्थित केली जात आहे.
पुण्यात मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न
विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी पुण्यात अनेक शक्कल लढवल्या जात आहे. मतदान केलेली शाई दाखवा आणि एक पुस्तक मोफत मिळवा, हा उपक्रम राबवण्यात येत आहे. पुण्यातील शनिवार पेठेतील गणपती मंडळाने हा उपक्रम सुरू केला आहे. अनेक पुणेकर मतदानाचं बोट दाखवून पुस्तक घेऊन जात आहेत. आम्हाला सुरक्षित ठेवणारं सरकार हवंय, असं मत पुणेकरांनी व्यक्त केलं आहे.
खेड शिवापुर टोलनाक्यावरची सातारहून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक टोल फ्री
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वरची पुण्यातील खेड शिवापुर टोलनाक्यावची सातारहून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक टोल फ्री करण्यात आली आहे. पुण्याच्या दिशेने येणार्या वाहनांची गर्दी जास्त असल्याने लोक मतदानापासुन वंचित राहू नयेत यासाठी प्रशासनाच्या सुचनेवरुन ही एकेरी वाहतुक टोल फ्री करण्यात आली आहे.
संजय शिरसाट यांचा शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल
छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातील शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना (उबाठाच्या) कार्यकर्त्यांना शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपल्या सोशल मिडियावरती शेअर केला आहे. उस्मानपुरा भागातील मतदान केंद्राजवळ हा सर्व प्रकार घडल्याची माहिती आहे. अंबादास दानवे यांनी शेअर केलेल्या पोस्टमधील व्हिडिओत संजय शिरसाट समोरच्या कार्यकर्त्यांना अश्लील शिवीगाळ करताना दिसून येत आहेत. तर दोन मिनिटात गायब करुन टाकेल अशी धमकी देताना दिसून येत आहे.
संजय शिरसाट यांची ही कोणती पध्दत आहे बोलायची? खुलेआम धमक्या देत आहेत. यावरती कारवाई करणार का? असा सवाल अंबादास दानवे यांनी निवडणूक आयोगासमोर उपस्थित केला आहे.