Sanju Samson Syed Mushtaq Ali Trophy 2024 : भारतीय यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिका दौरा चांगलाच गाजवला. या दौऱ्यावर त्याने 4 टी-20 सामन्यांमध्ये 2 शानदार शतके झळकावली आणि टीम इंडियाला 3-1 ने मालिका जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. संजूने गेल्या 5 डावात 3 शतके झळकावली आहेत. यावरून संजू किती तगड्या फॉर्ममध्ये याचा अंदाज येऊ शकतो. या उत्कृष्ट फॉर्मचा फायदा घेण्यासाठी संजू सॅमसनची केरळच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये संजू केरळचे नेतृत्व करणार आहे.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धा 23 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. तो नुकताच सचिन बेबीच्या नेतृत्वाखाली रणजी ट्रॉफी खेळला. भारतीय कसोटी संघ सध्या पाच सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. आणि जानेवारीपर्यंत कोणतेही मर्यादित षटकांचे सामने खेळायचे नाहीत. त्यामुळे सॅमसन सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळणार आहे.
सॅमसनबद्दल बोलायचे तर, यष्टीरक्षक फलंदाजाने त्याच्या अलीकडील पाच टी-20 सामन्यांमध्ये तीन शतके झळकावली आहेत. त्याने बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग दोन शतके झळकावली आणि त्यानंतर शतकासह दक्षिण आफ्रिका दौरा संपवला. त्याने बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात शतक झळकावले आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पहिल्या टी-20 सामन्यात शानदार शतक झळकावून नवीन इतिहास रचला. अशा प्रकारे तो सलग दोन टी-20 शतके झळकावणारा पहिला भारतीय ठरला. यानंतर तो सलग 2 सामन्यात शून्यावर बाद झाला असला तरी शतकासह मालिका संपवण्यात तो यशस्वी ठरला.
केरळ आपल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी मोहिमेची सुरुवात 23 नोव्हेंबर रोजी हैदराबादमध्ये सर्व्हिसेस विरुद्ध करेल. केरळला गोवा, मुंबई, महाराष्ट्र, सर्व्हिसेस, नागालँड आणि आंध्र प्रदेशसह गट ई मध्ये ठेवण्यात आले आहे. केरळ संघ आपले सर्व सामने जिमखाना मैदान आणि राजीव गांधी स्टेडियमवर खेळणार आहे.
सय्यद मुश्ताक अली स्पर्धेसाठी केरळ संघ : संजू सॅमसन (कर्णधार), सचिन बेबी, रोहन कुनुमल, जलज सक्सेना, विष्णू विनोद, मोहम्मद. अझरुद्दीन, बेसिल थंपी, एस निझार, अब्दुल बासिथ, ए स्करिया, अजनास ईएम, सिजोमन जोसेफ, मिधुन एस, वैशाख चंद्रन, विनोद कुमार सीव्ही, बेसिल एनपी, शराफुद्दीन एनएम, निधीश एमडी.
हे ही वाचा -