Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूर उत्तरच्या राजकारणात धमाक्यांची मालिका सुरुच असून आता काँग्रेसला पुन्हा एकदा झटका बसला आहे. कोल्हापूर उत्तरमधून तिकिट नाकारण्यात आल्यानंतर विद्यमान काँग्रेस आमदार जयश्री जाधव यांनी थेट शिवधनुष्य हाती घेतलं आहे. त्यामुळे कोल्हापूर उत्तरमध्ये राजकीय धमाका सुरुच आहे. जयश्री जाधव यांना काँग्रेसकडून तिकिट नाकारण्यात आलं आहे. त्यांना नाकारून राजेश लाटकर यांना तिकिट देण्यात आले, पण त्यांच्याही उमेदवारीला विरोध झाल्याने अखेर माजी आमदार मालोजीराजे यांच्या पत्नी मधुरिमाराजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
जयश्री जाधव यांना उमेदवारी नाकारली
कोल्हापूर उत्तरमध्ये शिंदे गटाकडून राजेश क्षीरसागर रिंगणात आहेत. जयश्री जाधव यांच्या बंडखोरीने त्यांना ताकद मिळाली असून काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांना कोल्हापूर उत्तरच्या राजकारणात तगडा झटका बसला आहे. कोल्हापूर उत्तरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय नाट्य रंगलं आहे. मतदारसंघ कोणाला मिळणार ते उमेदवारी कोणाला मिळणार? असा खेळ रंगला होता. भाजपकडून महाडिक यांनीही डाव टाकल्याने राजेश क्षीरसागर अडचणीत आले होते. मात्र, शिंदे यांनी क्षीरसागर यांनाच उमेदवारी देत विरोध झुगारला. दुसरीकडे, काँग्रेसमध्येही राजेश लाटकर यांच्या उमेदवारीवरून रणकंदन सुरु झाले. त्यामुळे उमेदवार बदलण्याची नामुष्की काँग्रेसवर आली.
कोल्हापूरमध्ये काँग्रेसची ताकद
दरम्यान, कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, करवीर आणि विधानपरिषदेतील दोन आमदार असे पाच आमदार काँग्रेसचे आहेत. स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील यांनी करवीरमध्ये दिलेल्या मताधिक्याने शाहू महाराजांचा विजय निश्चित झाला. मात्र, कोल्हापूर दक्षिण आणि उत्तरमध्ये शाहू महाराजांना अपेक्षित मताधिक्य मिळालं नव्हतं. कोल्हापूर दक्षिणमधून अवघ्या 6 हजार 702 मतांची आघाडी शाहू महाराजांना मिळाली. कोल्हापूर उत्तरमध्ये 14 हजार 528 मतांची आघाडी मिळाली. विशेष म्हणजे या दोन्ही मतदारसंघात विद्यमान काँग्रेस आमदार आहेत. दक्षिणमध्ये ऋतुराज पाटील, तर उत्तरमध्ये जयश्री जाधव आमदार होत्या.
गेल्या तीन निवडणुकीत कोल्हापूर उत्तरमध्ये काय घडलं?
- 2009 मध्ये छत्रपती मालोजीराजे यांचा पराभव करुन राजेश क्षीरसागर पहिल्यांदा आमदार. क्षीरसागर यांनी मालोजीराजे यांचा 3687 मतांनी पराभव केला
- 2014 साली पुन्हा राजेश क्षीरसागर हे 22 हजार 421 मताधिक्य घेऊन दुसऱ्यांना आमदार झाले. त्यावेळी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवलेल्या सत्यजित कदम यांचा पराभव केला.
- 2019 साली राजेश क्षीरसागर यांचा 15 हजार 199 मतांनी पराभव करुन काँग्रेसचे चंद्रकांत जाधव यांनी विजय खेचून आणला होता.
- 2022 मध्ये चंद्रकांत जाधव यांच्या निधनाने कोल्हापूर उत्तरमध्ये पोटनिवडणूक झाली. यामध्ये जयश्री जाधव विजयी 18 हजार 901 मतांनी झाल्या होत्या. त्यांनी सत्यजित कदम यांचा पराभव केला होता.
इतर महत्वाच्या बातम्या