मुंबई: विधानसभा निवडणुकीमध्ये तिकिटांसाठी मोठ्या प्रमाणावर चढाओढ पहायली मिळाली. या विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक मतदारसंघात नेत्यांच्या कुटूंबातील सदस्यांना संधी देण्यात आली आहे. अशातच वारंवार घराणेशाहीवरती वारंवार टीका करणाऱ्या भाजपने  निवडणुकीत काका-पुतणे, नेत्यांचे नातेवाइक, बाप-बेटे यांना उमेदवारी दिल्याचे दिसून येते, याबाबत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता, आपला पक्ष तर घराणेशाहीविरुद्ध बोलत आला आहे, मग आता तुम्ही तेच करत आहात का या प्रश्नावर फडणवीसांनी उत्तर देताना म्हणाले, कधीकधी वास्तविकतेचे भान ठेवूनही लढावे लागते. 


नेमकं काय म्हणालेत देवेंद्र फडणवीस?


कुरुक्षेत्रासारखी लढाई झाली आहे, काही इकडचे तिकडे, तिकडचे इकडे गेले आहेत. तात्त्विक लढाई नेहमीच असते,  कधीकधी वास्तविकतेचे भान ठेवूनही लढावे लागते. आता महाराष्ट्र राजकीय संक्रमणावस्थेतून जात आहे. आजचे राजकारण कायम राहणार नाही.  जिंकलो पाहिजे आणि कालसंगत राहिले पाहिजे यासाठी काही निर्णय करावे लागतात.


शरद पवार हे घरे फोडण्याचे जनक - देवेंद्र फडणवीस


गेल्या काही दिवसांमध्ये घरफोडीची मोठी चर्चा राजकारणात रंगली याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना लक्ष्य केलं आहे. राजकारणातली घरे, कुटुंब फोडणारे जनक शरद पवार हेच आहेत, आजही ते हेच करत आहेत. त्यांनी केलं म्हणजे चाणक्यनीती आणि केलं तर ते डावपेच? हा कुठला न्याय आहे? लोकांना सगळं कळतं, मला खलनायक बनवण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न मतदार हाणून पाडतील, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 


मुंडेंसोबत अन्य कित्येक घरे फोडणाऱ्यांनी माझ्यावर आरोप करणं हास्यास्पद आहे. पक्ष, घर फोडण्याचे मास्टरमाइंड, जनक कोण हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यांनी केली तर चाणक्यनीती आणि मी केलं तर डावपेच. अजित पवार माझ्यासोबत आले तर घर फोडली आणि शरद पवारांनी घरे फोडली ती, आताही घरे फोडून ते तिकिटे देत आहेत, असंही फडणवीस यावेळी म्हणालेत.


 मी दोन पक्ष फोडून परत आलो...या त्यांच्याच वाक्यावर प्रतिक्रिया


मी दोन पक्ष फोडून परत आलो, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं. त्याबाबतच्या प्रश्नावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमामध्ये मी ते चेष्टेने गमतीने म्हणालो होतो, मी पक्ष फोडल्याचा दावा कधीही केला नाही. पण आता चेष्टा आणि गमत सार्वजिनक मंचावर करू नयेत, हे आता लक्षात ठेवलं पाहिजे. महाविकास आघाडीतील पक्षांनी सातत्यांने माझ्यावर, माझ्या कुटुंबावर हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीसला व्हिलन ठरवा हे त्यांचं एकमेव ध्येय होते. त्यामध्ये ते यशस्वी होऊ शकले नाहीत. फडणवीसांचा संबंध नाही त्याच्याशी जोडून बदनामी केली जाते, हे लोकांना कळलं आहे, विरोधकांचे पितळ उघडं पडलं आहे. मी कसा आहे, जाती पातींपलिकडे जाऊन काम करतो हे लोकांना कळतं आहे, असंही पुढे देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.