Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकांचे वारे महाराष्ट्रभरात वाहताना पाहायला मिळत आहेत. अनेक राजकारणी उमेदवारी अर्ज भरून विजय मिळवण्यासाठी धडपड करताना पाहायला मिळत आहेत. परंतु अशाच निवडणुकांमध्ये विजय न मिळाल्यानंतर आणि सातत्याने पराभव झाल्यानंतर घराची काय अवस्था होते? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरामधील एका सर्वसामान्य नेत्याची ही स्टोरी आहे.
वसमत शहरातील रहिवासी असलेले वय 73 दिगंबर नाईकवाडे यांनी आत्तापर्यंत 22 निवडणुका लढल्या आहेत. मागील पन्नास वर्षापासून दिगंबर नाईकवाडे वेगवेगळ्या निवडणुका लढत आहेत. राजकारणातून समाजकार्य करावे, सत्ता आल्यानंतर जनतेचे प्रश्न सोडवता येतील असा विश्वास नाईकवाडे यांना होता. त्यामुळे दिगंबर नाईकवाडे यांनी ग्रामपंचायत पासून ते लोकसभेपर्यंत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका ,विधानसभा आणि लोकसभा अशा वेगवेगळ्या 22 वेळा निवडणुका लढवल्या आहेत. 1995 या काळात विधानसभा निवडणुकांसाठी दिगंबर नाईकवाडे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज भरला होता.
परंतु राजकारण वाटते तितकं सोपं नसतं. निवडणुका म्हटलं की पैसा आलाच आणि नाईकवाडे यांच्याकडे तर पैसा नव्हता. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे बागायती शेती असलेली सात एकर शेती विकण्याचा निर्णय घेतला. जमीन विकून मिळालेल्या पैशातून निवडणूक लढायची आणि विजयी झाल्यानंतर विकलेली जमीन परत घेऊ असा विश्वास होता. त्यामुळे लाख मोलाचे असलेली रोड लगतची सात एकर बागायती जमीन तेव्हा दिगंबर नाईकवाडे यांनी विकली. त्या जमिनीतून मिळालेला पैसा निवडणुकीच्या प्रचारात कार्यकर्त्यावर पैसे खर्च केला. प्रचारासाठी गाड्या भाड्याने लावणे या विविध कारणासाठी हा पैसा खर्च केला.
नाईकवाडे यांना अपेक्षा होती की या निवडणुकीत त्यांचा विजय होईल. परंतु तसं काही झालं नाही आणि तेव्हा नाईकवाडे पराभूत झाले. स्वतःकडे असलेली बागायती शेती गेली. निवडणुकीतही पराभव झाला. पैसे नसल्यामुळे कार्यकर्ते सुद्धा जवळ फिरकत नव्हते, असे असताना सुद्धा नाईकवाडे यांनी त्यांचे काम न थांबवता सुरूच ठेवलं. तेव्हापासून आतापर्यंत हे काम सुरूच आहे. नाईकवाडे यांनी तब्बल 22 निवडणुका लढल्या आहेत. आज त्यांचं वय 73 वर्ष इतकं आहे. बागायती असलेली जमीन विकली त्यामुळे जवळ कोणतीही मालमत्ता राहिली नाही. वडिलांनी जमीन विकली त्यामुळे नाईकवाडे यांच्या मुलांनीही त्यांची साथ सोडली. आता दिगंबर नाईकवाडे आणि त्यांची पत्नी दोन रूमच्या असलेल्या पत्र्याच्या घरात राहत आहेत. या विधानसभा निवडणुकीत नाईकवाडे यांनी पुन्हा एकदा उमेदवारी अर्ज भरला आहे. जवळ असलेले पैसे संपल्याने कार्यकर्ते दूर पाळले. त्यामुळे दिगंबर नाईकवाडे यांनी स्वतः लाऊडस्पिकर मधून प्रचार सुरू केलाय.
दिगंबर नाईकवाडे यांच्या संसाराचा गाडा आता त्यांची पत्नी चालवत आहेत. कधीकाळी सात एकर जमिनीची मालकीण असलेली बाई आज दुसऱ्याच्या शेतामध्ये दोनशे रुपये रोजाने कामाला जाते आणि दिगंबर नाईकवाडे यांचा संसार चालवण्याचे काम ती माऊली करत आहे. जनतेचे प्रश्न राजकारणाच्या माध्यमातून सत्तेत जात सोडवता येतील असा विचार करणारे महाराष्ट्रात असे अनेक दिगंबर नाईकवाडे आहेत. परंतु निवडणुकांमध्ये आलेलं अपयश हे कुटुंबावर दूरगामी परिणाम करणारा असतं सध्या राजकारणाची बदललेली परिभाषा आणि राजकारण्यांनी राजकारणाचा केलेला चिखल बघता अनेक कुटुंबांचे अशाच पद्धतीने आर्थिक हाल होणार नाहीत.