मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरी कसोटी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी दोन्ही संघांनी मिळून 14 विकेट गमावल्या आहेत. न्यूझीलंडच्या संघानं पहिल्या डावात 235 धावा केल्या. तर,  भारतानं  पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत  4 विकेटवर 86 धावा केल्या. खरंतर भारतानं पहिल्या डावाची चांगली सुरुवात केली होती.  मात्र, भारताच्या डावाच्या 18 व्या ओव्हरमध्ये यशस्वी जयस्वाल, नाईट वॉचमन मोहम्मद सिराज बाद झाला. त्यानंतर, पुढच्याच ओव्हरमध्ये विराट कोहली धावबाद झाला. यामुळं एकेकाळी कसोटीमध्ये भारत भक्कम स्थितीमध्ये होता मात्र सलग तीन विकेट गमावल्यानं न्यूझीलंडनं जोरदार कमबॅक केलं. 


पहिल्या दिवसाच्या शेवटच्या दोन ओव्हरमध्ये पलटवार 


भारताच्या डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालनं केली होती. रोहित शर्मा चांगली सुरुवात करुन मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरला. रोहित शर्मानं 18 धावा केल्या. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिलनं भारताचा डाव सावरला. यशस्वी आणि शुभमन या दोघांनी 53 धावांची भागिदारी केली. भारताच्या डावाची 18 वी ओव्हर न्यूझीलंडचा कॅप्टन टॉम लाथम यानं एजाज पटेलला गोलंदाजी दिली. एजाज पटेलनं कॅप्टननं सोपवलेली मोहीम फत्ते केली. यशस्वी जयस्वालला त्यानं 30 धावांवर बाद केलं. त्यानंतर टीम इंडियाच्या मॅनेजमेंटनं नाईट वॉचमन म्हणून मोहम्मद सिराजला पाठवलं मात्र तो पहिल्याच बॉलवर बाद झाला.  यानंतर भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली मैदानावर आला. मात्र, तो मॅट हेन्रीच्या थ्रोवर बाद झाला. यामुळं भारतानं पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 86 धावा 4 विकेट गमावून केल्या आहेत. 


न्यूझीलंडचं कमबॅक 


भारताचा डाव रोहित शर्मा बाद झाल्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांनी सावरला होता. मात्र, न्यूझीलंडनं शेवटच्या दोन ओव्हरमध्ये तीन विकेट काढत टीम  इंडियावर पलटवार केला.  सध्या भारताचे शुभमन गिल आणि रिषभ पंत हे दोन खेळाडू मैदानावर आहेत. 


सुंदर- जडेजाची कमाल, न्यूझीलंडला 235 धावांवर रोखलं


न्यूझीलंडनं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी सुरु केली होती. मात्र, न्यूझीलंडला पहिल्याच दिवशी 235 धावांवर रोखण्यात टीम इंडियाला यश आलं.  रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या फिरकीपुढं न्यूझीलंडचे फलंदाज टिकाव धरु शकले नाहीत. रवींद्र जडेजानं 5 विकेट घेतल्या तर सुंदरनं 4 विकेट घेतल्या. 


इतर बातम्या :