नागपूर : महाराष्ट्रात मतदान संपल्यानंतर ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेसाठी राज्य पोलिसांनी संपूर्ण नियोजन केले आहे. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाचे विशिष्ट निर्देश असून राज्य पोलीस प्रशासन त्यांचे तंतोतंत पालन करेल, असे मत पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी व्यक्त केले आहे.

"निवडणूक आणि त्यानंतर ईव्हीएमची सुरक्षा करताना आम्ही दक्ष राहू. शांततापूर्ण वातावरणात निवडणुका होणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे. यावेळेलादेखील कोणताही अनुचित प्रकार होणार नाही," असा विश्वास जयस्वाल यांनी व्यक्त केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पोलीस महासंचालकांनी नागपूर आणि अमरावती भागातील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचनाही दिल्या. तसेच ते म्हणाले की, "राज्यात चार टप्प्यांमध्ये निवडणुका होत असल्यामुळे पोलिसांना कोणत्याही क्षणी मदतीसाठी हालचाली करणे सोपे जाणार आहे."

गडचिरोलीमध्ये भयमुक्त वातावरणात निवडणुका व्हाव्यात यासाठी पोलिसांनी विशेष नियोजन केले असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले. गडचिरोली जिल्ह्यातील संवेदनशील भागात निवडणुकीच्या दिवशी पोलिंग पार्टीला नेण्यासाठी आणि परत आणण्यासाठी हेलिकॉप्टर आणि इतर सर्व व्यवस्था केली जाणार आहे. परंतु त्या व्यवस्थेबाबत सार्वजनिकरित्या मी माहिती देऊ शकत नाही.

पुलवामामधील घटनेनंतर पोलीस फोर्स दक्ष राहणे गरजेचे असून महाराष्ट्र पोलीस दक्ष आहेत. सर्व युनिट कमांडर्सला तशा सूचना देण्यात आल्या आहेत. गेल्या काही आठवड्यांत मुंबईमध्ये 2 ठिकाणी स्फोटके आढळली आहेत, परंतु अद्याप त्या दोन्ही घटनांचा दहशतवादाशी काहीही संबंध आढळलेला नाही. अशी माहिती पोलीस महासंचालकांनी दिली.

महासंचालक जयस्वाल म्हणाले की," यापूर्वीही महाराष्ट्रात आणि मुंबईत अनेक दशतवादी कारवाया झाल्या आहेत. परंतु आता तशा कारवाया थांबवण्याची आमची क्षमता खूप वाढली आहे. आमचं intelligence network आणि intelligence gathering mechanism अनेक पटींनी सुधारले आहे."