मुंबई : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे-पाटील यांनी भाजपत प्रवेश केला असतानाच आता मुंबईतील काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकरही भाजपच्या वाटेवर आहेत. वडाळ्याचे काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे.


WATCH | काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा


कारण, कोळंबकर यांनी त्यांच्या कार्यालयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह फोटो असलेला एक बॅनर लावला आहे. या बॅनरमध्ये काँग्रेसचा कोणताही नेता दिसत नसल्यामुळं त्यांच्या भाजपाच्या प्रवेशांच्या चर्चांना उधाण आलं आहे.

कोळंबकर हे नारायण राणे यांचे खंदे समर्थक मानले जातात. ते मुंबईतील वडाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. मुंबईतील पूर्वीच्या नायगाव आणि आताच्या वडाळा मतदारसंघातून सहा वेळा कोळंबकर हे विधानसभेवर निवडून आलेत.

कार्यालयासमोरच कालिदास कोळंबकर यांनी बॅनरवर मुख्यमंत्र्यांचा फोटो लावून आपला इरादा जाहीर केला आहे. कोळंबकर यांनी यापूर्वी गणेशोत्सवातही बॅनरवर मुख्यमंत्र्यांचे फोटो लावले होते.

तिकडे काँग्रेसमध्ये जाणार असल्याची घोषणा करणाऱ्या संजय काकडेंनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. मात्र तरीही त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय बदललेला नाही.  राधाकृष्ण विखेंचा मुलगा सुजय विखे यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांनी राज ठाकरेंना जय महाराष्ट्र करत अखेर हातावर शिवबंधन बांधलं आहे.

दरम्यान, या पक्षबदलाच्या घटनांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लहान मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे, काँग्रेस-राष्ट्रवादीतील पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी असा टोला भाजपला लगावला आहे.

सुजय विखे पाटलांच्या भाजप प्रवेशानंतर "महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे. सर्वांनी, विशेषतः काँग्रेस-राष्ट्रवादीतील पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी ! -जनहितार्थ जारी" असं ट्विट आव्हाडांनी केलं आहे.