TDS vs TCS: आयटीआर भरण्याची वेळ दिवसेंदिवस जवळ येत आहे. 31 जुलै ही आयटीआर भरण्याची शेवटची तारीख आहे. पण त्यापूर्वी तुम्हाला हे जाणून घेणं गरजेचं आहे की, TDS आणि TCS मधला फरक नेमका काय? अनेकदा लोक TDS आणि TCS बद्दल गोंधळलेले असतात. या दोघांमधला फरक अनेकांना कळत नाही. TDS आणि TCS कर वसूल करण्याच्या दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत. TDS म्हणजे टॅक्स डिडक्शन अॅट सोर्स (Tax Deduction at Source) तर TCS म्हणजे टॅक्स कलेक्शन अॅट सोर्स (Tax Collection at Source). दोन्हीमध्ये, पैशाचे व्यवहार करताना टॅक्स कापला जातो. टॅक्स म्हणून कापलेले पैसे सरकारकडे जमा केले जातात.  पण, दोन्हीमध्ये टॅक्स भरण्याच्या पद्धतीत फरक आहे आणि हाच फरक नव्यानं टॅक्स रिटर्न फाईल करणाऱ्यांना समजत नाही. या दोन्ही प्रकरणांमध्ये रिटर्न भरणं आवश्यक असतं. जाणून घेऊयात TDS आणि TCS म्हणजे काय? 


TDS म्हणजे काय?


एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नातून कर वजा करून उर्वरित रक्कम त्या व्यक्तिला दिली जाते. टॅक्स म्हणून कापलेल्या रकमेला TDS म्हणतात. सरकार टीडीएसच्या माध्यमातून कर वसूल करते. वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पन्नाच्या स्रोतांवर ते वजा केले जाते. यामध्ये पगार, व्याज आणि गुंतवणुकीवर मिळणारं कमिशन इत्यादींचा समावेश आहे. पैसे देणारी म्हणजेच, तुम्ही एखाद्या ठिकाणी नोकरी करत असाल तर ती संस्था टीडीएस म्हणून ठराविक रक्कम कापते. सरकार प्रत्येक आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी कोणत्या प्रकारच्या पेमेंटवर किती टीडीएस कापला जाईल, यासंदर्भात घोषणा करतं. उत्पन्नाच्या स्रोतावर कर कपात केल्यामुळे, त्याला स्रोतावर कर वजावट (Tax Deducted at the Source) म्हणजेच TDS असं म्हणतात. अशाप्रकारे कर कपात करणार्‍याला Deductor म्हणतात आणि ज्या व्यक्तीचा TDS कापला जातो त्याला Deductee म्हणतात.


TDS म्हणजे काय? उदाहरणाद्वारे समजून घेऊयात... 


समजा तुम्हाला 10 लाख रुपयांची लॉटरी लागली आहे. लॉटरीत जिंकलेल्या संपूर्ण रकमेवर 30 टक्के TDS कापण्याचा नियम आहे. तुम्हाला 10 लाख रुपयांपैकी 30 टक्के रक्कम वजा केल्यावर, त्यातून फक्त उरलेली रक्कम मिळेल. म्हणजेच, तुमच्या 10 लाख रुपयांच्या लॉटरीमधून 3 लाख रुपये टीडीएस म्हणून कापले जातील. अशा प्रकारे, दहा लाख रुपयांची लॉटरी जिंकण्यासाठी तुम्हाला सात लाख रुपये मिळतील. तुम्हाला कुठूनही प्रोफेशनल फी मिळाल्यास, 30 हजार रुपये किंवा त्याहून अधिक वार्षिक पेमेंट केल्यास त्यावर 10 टक्के TDS कापला जातो.


TCS म्हणजे काय?


TCS म्हणजे टॅक्स कलेक्शन अॅट सोर्स (Tax Collection at Source). म्हणजे स्त्रोतावर जमा केलेला कर. हा कर विशिष्ट प्रकारच्या वस्तूंच्या व्यवहारावर लावला जातो. जसे दारू, लाकूड, भंगार, खनिजं इत्यादी. मालाची किंमत घेताना त्यात कराचा पैसाही जोडून सरकारकडे जमा केला जातो. खरेदीदाराकडून (Purchaser) TCS गोळा करून ते सरकारकडे जमा करण्याची जबाबदारी मालाची विक्री करणाऱ्या व्यक्तीची असते. म्हणजेच, ती विक्रेत्याची (Seller) जबाबदारी असते. किंमत मिळवण्याच्या स्त्रोताकडून कर गोळा केल्यामुळे, याला Tax Collected at the Source, म्हणजे TCS असं म्हटलं जातं. आयकर कायद्याच्या कलम 206C (1) नुसार, व्यावसायिक कारणांसाठी काही वस्तूंच्या विक्रीवरच TCS कापण्याचा नियम आहे. वैयक्तिक कारणासाठी एखादी गोष्ट विकत घेतल्यास हा नियम लागू होत नाही.


TCS म्हणजे काय? उदाहरणाद्वारे समजून घेऊयात... 


समजा एखाद्या व्यक्तीनं एका कंपनीला एक लाख रुपये किमतीचं भंगार विकलं. भंगारावर 1 टक्के TCS चा नियम आहे. एक लाख रुपयांचे एक टक्के म्हणजे, 1 हजार रुपये. त्यामुळे कंपनीकडून एकूण एक लाख एक हजार रुपये घेतले जाणार. अशा प्रकारे जमा झालेल्या 1000 रुपयांचे TCS आयकर विभागाकडे जमा करावा लागेल. त्याचा दर वेगवेगळ्या गोष्टींवर वेगवेगळा असतो. उदाहरणार्थ, दारूवर 2.5 टक्के TCS आकारला जातो.