Maharashtra Legislative Council : राज्यसभेच्या सहा जागांसाठी उमेदवारी अर्ज भरले गेले असून, 10 जूनला राज्यसभा निवडणूक पार पडेल. मात्र, त्यानंतर विधानपरिषदेचा निवडणुकीचा आखाडाही रंगणार आहे. विधान परिषदेतील दहा सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होऊन त्या जागांसाठी 20 जूनला निवडणूक होणार आहे. या विधानपरिषद निवडणुकांसाठी  राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली असून, उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षांमध्ये अनेकांची रस्सीखेच सुरू आहे असे चित्र आहे.


या सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे.
विधान परिषदेवर भारतीय जनता पक्षाकडून असलेले प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, सुजितसिंह ठाकूर, विनायक मेटे, सदाभाऊ खोत तसेच दिवंगत नेते आरएस सिंह यांचा समावेश आहे. शिवसेनेकडून ज्येष्ठ नेते आणि आमदार दिवाकर रावते, मंत्री सुभाष देसाई हे निवृत्त होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून रामराजे निंबाळकर आणि संजय दौंड यांचाही कार्यकाळ संपत आहे.


कधी असेल 10 जागांसाठी निवडणूक 
विधान परिषदेतील दहा सदस्यांचा कार्यकाळ जुलै पूर्ण होऊन त्या जागांसाठी 20 जूनला निवडणूक होणार आहे.2 जूनला अधिसूचना जाहीर होणार असून 9 जूनपासून अर्ज दाखल करता येणार आहेत. परिषदेच्या दहा जागांसाठी 20 जूनला मतदान होणार आहे. जुलै महिन्यात विधान परिषद सदस्यांचा कार्यकाल पूर्ण होतोय, मात्र नियमानुसार त्यापूर्वी निवडणूक घ्याव्या लागतात असे राजकीय जाणकार सांगतात


कसं असू शकतं संख्याबळ ?
महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी येत्या 20 जून रोजी निवडणूक होत आहे. विधानससभेतील संख्याबळानुसार भाजपचे 4, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी 2, काँग्रेसचा एक आणि 10 व्या जागेसाठी पुन्हा भाजप आणि मविआमध्ये चुरस होऊ शकते.
म्हणजे राज्यसभा निवडणूकीप्रमाणेच राज्याचं राजकारण तापण्याची शक्यता आहे.विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या सत्तावीस मतांची गरज उमेदवाराला असते. भारतीय जनता पक्षाकडे मित्रपक्षांसह 113 आमदारांचे संख्याबळ आहे तर महाविकासआघाडीकडे एकूण 169 आमदारांचे संख्याबळ आहे. यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसकडे 54, शिवसेनेकडे 56 तर काँग्रेसकडे 45 आमदार आहेत. मात्र, विधान परिषदेवर काँग्रेसचाही दुसरा उमेदवार देण्यात यावा. यासाठी काँग्रेसने आता मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र, काँग्रेसचा दुसरा उमेदवार निवडून आणायचा असल्यास भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये लढत पाहायला मिळेल.


भाजपकडून कोणाला उमेदवारी ?
भाजपच्या पाच जागा रिक्त होणार असून केवळ चार उमेदवारच निवडून येणार आहेत. त्यामुळे भाजपच्या गोटातून कोणाचा पत्ता कट होणार याबाबतच्या चर्चा रंगल्या आहेत . भारतीय जनता पक्षाकडून विधानपरिषदेवर प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांची वर्णी जवळजवळ निश्चित मानली जात आहे. प्रवीण दरेकर हे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आहेत तर आमदार प्रसाद लाड हे देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी निकटवर्तीय मानले जातात. यामुळे या दोन उमेदवारांची नावे निश्चित आहेत अशी भाजप सूत्रांची माहिती आहे. मात्र, तेथेच भाजपकडून असलेले आमदार सदाभाऊ खोत, सुजितसिंह ठाकुर, विनायक मेटे यांचे पत्ते कट होण्याची शक्यता आहे . तर दुसरीकडे माजी मंत्री राम शिंदे, पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ,संजय  पांडे यांची चर्चा सुरू आहे.आपल्याला  उमेदवारी मिळावी यासाठी  देवेंद्र फडणीस यांच्याकडे भाजप मधील इच्छुक लॉबिंग करत असल्याची चर्चा आहे.


शिवसेनेकडून कोणाला उमेदवारी ?
शिवसेनेकडून मंत्री सुभाष देसाई आणि माजी मंत्री दिवाकर रावते यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यात, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना पुन्हा एकदा शिवसेना  विधानपरिषदेवर पाठवणार  आहे. पण, दिवाकर रावते यांना पुन्हा संधी देण्याची शक्यता कमी आहे असे राजकीय जाणकार सांगतात. त्यामुळे या एका जागेवर शिवसेनेच्या गोटातही लॉबिंग सुरू झाले आहे. राज्यसभेवर ज्याप्रमाणे कोल्हापूरचे कडवट शिवसैनिक संजय पवार यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संधी दिली. त्याच प्रमाणे विधान परिषदेवर ही सामान्य शिवसैनिकांना संधी देण्यात येईल, अशी चर्चा शिवसेनेच्या गोटात आहे. तरीही या जागेसाठी सचिन अहिर, दीपाली सय्यद ,यांच्या नावाचाही विचार केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी ?
विधान परिषदेवर काँग्रेसचा एकाही आमदाराचा कार्यकाळ पूर्ण होत नाही. मात्र, मतदानाच्या आकडेवारीनुसार काँग्रेसच्या एका आमदारास विधान परिषदेवर जाता येणार आहे. तसेच काँग्रेस दुसऱ्या जागेसाठीही प्रयत्न करणार आहे. त्यामुळे काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबतची उत्सुकता काँग्रेसच्या गोटात आहे.मात्र भाई जगताप , नसीम खान यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र मुंबईतून एकच उमेदवार देऊन दुसरा पश्चिम महाराष्ट्र व विदर्भातून काँग्रेस देण्याची चर्चा काँग्रेसच्या वर्तुळात आहे


राष्ट्रवादीकडून कोणाला उमेदवारी ?
राष्ट्रवादी काँग्रेसकडून रामराजे निंबाळकर आणि संजय दौंड यांचा कार्यकाळ संपत असला तरी यामध्ये रामराजे निंबाळकर यांना संधी दिली जाईल, अशी दाट शक्यता आहे. रामराजे निंबाळकर हे शरद पवार यांच्या अगदी निकटवर्तीय समजले जातात. त्यातच ते विधान परिषद सभापती आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा विधानपरिषदेवरची संधी दिली जाण्याची दाट शक्यता. मात्र, संजय दौंड यांना पक्ष पुन्हा एकदा संधी मिळणार नसल्याची माहिती आहे.  अद्याप उमेदवाराची शोधाशोध सुरू आहे.पण दुसऱ्या जागेवर तरुण उमेदवार देण्याची चर्चा सध्या सुरू आहे.


इच्छुक जोरदार कामाला लागले आहेत
विधानपरिषद उमेदवारी मिळवण्यासाठी आता भाजप ,शिवसेना ,काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये इच्छुक जोरदार कामाला लागले आहेत. इच्छुक पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रम सध्या सर्वत्र घेताना दिसत आहेत. तसेच अनेक जण उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षांतर्गत लॉबिंग देखील करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सर्वच पक्षातील पक्षश्रेष्ठी देखील या जागांसाठी अभ्यास करत आहेत व त्या संदर्भात नेते मंडळींशी चर्चा देखील करत आहेत.