कोल्हापूर : झी मराठी वाहिनीवरील आदेश बांदेकर सूत्रसंचालन करत असलेल्या होम मिनिस्टर महाराष्ट्रातील घराघरात स्थान मिळवले आहे. गेल्या 18 वर्षांपासून 'होम मिनिस्टर'हा शो प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोची आणि होस्ट आदेश बांदेकर यांची लोकप्रियता अफाट आहे. त्यांचे सर्व वयोगटातील चाहते आहेत. 


'होम मिनिस्टर'च्या कार्यक्रमामधील कोल्हापूरमधील व्हायरल उखाणा व्हिडिओची चांगलीच चर्चा रंगली आहे. कारण तो उखाणा काही सेकंदाचा नाही, तर तब्बल सव्वा तीन मिनिटांचा आहे. या उखाण्यातून वहिनींनी अख्ख्या कोल्हापूरची महती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. व्हायरल झालेल्या वहिनींनी उखाण्याच्या माध्यमातून कोल्हापूरची सामाजिक राजकीय इतिहास, खाद्यसंस्कृती, चौकाचौकाची खासियत, किल्ले  यांची महती सांगितली आहे.


वहिनींना सादर केला उखाणा जसाच्या तसा


प्रथम वंदावा गणपती, धन्य ही भारतीय संस्कृती.. अहो इथचं होऊन गेल्या आहेत मोठ मोठ्या व्यक्ती आणि महारथी, शेष नागाच्या आधी धरणीची गती तोच जुळवतो नाती आणि गोती.. भक्तीसाठी विठ्ठल उभा राहिला विठेवरती... ज्ञानेश्वराने चालवल्या भिंती.. हिंदू, मुस्लीम, शीख, ईसाई सारेच इथं भाई भाई..शिवाजी महाराजांनी हिंदुत्वाचा झेंडा फडकावला त्रिलोकी,अहो स्त्रिया नाहीत येथील कमी, सांगते राणी लक्ष्मीबाईंची ख्याती, सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची शाल घेतली हाती, शाहू महाराजांनी शिक्षण मोफत केले येथील गोरगरिब जनतेसाठी, प्रत्येक कर्तबागारी पुरुषाच्या मागे असतो एका स्त्रीचा हात. 


कधी माता, तर कधी बहिण, तर कधी पत्नी म्हणून देते ती जन्मोजन्मीची साथ. म्हणून मैत्रिणींनो सांगते, करू नका प्रसूतीपूर्व गर्भ लिंगनिदान चाचणी, मुलगीच नाही जगली, तर उद्याच्या जगाला कुठली मिळेल आई. धन्य ही भारतीय संस्कृती आणि धन्य ही भारतीय नारी, धन्य ही करवीरनगरी. करवीरनगरीची मी गाते गाथा, सर्व प्रथम पन्हाळगडावर झुकतो माझा माथा. पन्हाळगडावर आहे बिबट्यांचा पारा, जोतिबाच्या डोंगरावर फक्त गुलाल खोबऱ्याचा मारा. दसरा चौकातील शाहू महाराजांना मी वाकून करते त्रिवार मुजरा, तुळजाभवानीवर भवानी मंडपात करतात हळदी कुंकूवाचा मारा,आमच्या येथील खासबाग मैदानात पैलवान खेळतो कुस्ती, एक गडी हुशार, तर दुसरा एक त्याच्यापेक्षा जास्ती. आमच्या इथं पेशवाई, कपड्यांमध्ये नवलाई, चंद्रासारखा मी नेसेन शालू, पायात कोल्हापुरी चप्पल घातलं, तर सांगा कशी हळूहळू चालू ? रुप खुलवते नऊवारी, कंगन आणि चुनरी,नथणी, बिलवर, बांगड्या, तोडे सरी, पण माझ्या गळ्यातील कोल्हापुरी साजचं उठून दिसतो ना भारी.


बावड्याच्या मिसळीचा चटका लागेल जरा,पण तोंडाची चव प्याल तेव्हा तांबडा पांढरा, राजाभाऊंची भेळ, मर्दानी आखाड्यातील खेळ, लावणी आणि तमाशाचा सुरेख बसला खेळ, आमच्या शाहिराचे पोवाडे असताना तुम्ही विसरून जाल तहान भूक आणि वेळ. कोल्हापूरची लवंगी मिरची कोल्हापूरची नार, ताराराणीच्या तलवारीच्या पातीसारखी माझ्या जीभेला आहे धार, आमच्या इथं मानकरी लोकांच्या डोक्यावर असतात नेहमी फेटे, सगळ्या गायी म्हशींनी भरलेत दुध कट्टे, बिंदू चौकात असतो नेहमी पोलिसांचा पारा, महाद्वार रोड कसा तरुण मुलांचा घेरा, आई महालक्ष्मी वंदन करते मी तुला, सौभाग्यवती होऊ दे असा आशीर्वाद लाभू दे मला, आता साकोली काॅर्नरचा चढ लागेल जरा, मग आमच्या रंकाळ्यावर कसा मंजुळ मंजुळ वारा, भेलपुरी, पाणीपुरी आणि बटाटेवडे, त्याच्यावरती ताव मारा. 


आमच्या पदपथ उड्डाणाला मारायचा एक फेरा,शालिनी पॅलेसच्या परिसरात पसरलाय गवताचा गरा, तिथंच हाय मोठं घड्याळ आणि वाजलंय बारा, घरी लवकर गेल तर बंर नाही, तर आमच्या सासूबाईच्या नाकानं हू (नाक मुरडून) केलाच. त्यामुळे उशीर न केलेला बरा. त्यामुळे जाता जाता जावळाच्या बालगणेशाला मी नमस्कार केला, त्याने प्रसन्न होऊन मला सौभाग्यवतीचा आशीर्वाद दिला.हाथले मी मनी, मला लाभलेत माझ्या मनासारखे धनी. आता मी घेते माझ्या धन्याचे नाव, पण कान जरा इकडं करा. मी धन्याचं नाव घेईन ओ जोरात, पण तुम्ही नुसता करा जयजयकार सारा. सावळं आहे रुप,तसाच श्रीकृष्ण सावळा, पण बोलतोय इतकं प्रेमळ, जसं फुलांच्या माळा घालतोय मला. कोल्हापूरची शान राखणारा पैलवान गडी शोभतोय खरा. म्हणूनच बघा मैत्रिणींनो आज होम मिनिस्टरमध्ये मी दिसतोय म्हणून अजितरावांचा किती फुललाय चेहरा.