अहिल्यानगर : श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात (Shrirampur Assembly Constituency) नवा ट्विस्ट आला आहे. महायुतीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील लहू कानडे यांना उमेदवारी जाहीर झालेली असताना शिवसेना शिंदे गटाकडून भाऊसाहेब कांबळे (Bhausaheb Kamble) यांना उमेदवारी देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे भाऊसाहेब कांबळे यांच्यासाठी सभा घेणार होते. मात्र आज होणारी सभा अचानक रद्द झाल्याने शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांचा अचानक रक्तदान वाढला असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
श्रीरामपूर विधानसभेत महायुतीतील दोन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून भाऊसाहेब कांबळे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून लहू कानडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी लहू कानडे यांच्यासाठी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी सभा घेतली होती. आज भाऊसाहेब कांबळे यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र ऐनवेळी सभा रद्द झाल्याने भाऊसाहेब कांबळे यांनी टेन्शन घेतले असून काल रात्रीपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे दुसरीकडे श्रीरामपूरला लागून असलेल्या नेवासा मतदारसंघातील उमेदवारासाठी थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांची सभा पार पडणार आहे. श्रीरामपूर येथील सभा ऐनवेळी रद्द करण्याचे कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
काय म्हणाले भाऊसाहेब कांबळे?
नियोजित सभा ऐनवेळी रद्द झाल्याने भाऊसाहेब कांबळे रक्तदाब वाढला आहे. भाऊसाहेब कांबळे यांच्यावर श्रीरामपूर शहरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत एबीपी माझाशी बोलताना भाऊसाहेब कांबळे म्हणाले की, जिल्ह्यातील काही नेत्यांचा माझ्यावर दबाव आहे. मला उमेदवारी देणारे हेच लोकं आणि मागे घ्यायला लावणारे हेच लोकं आहेत, असे म्हणत त्यांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर नाव न घेता टीका केली. पक्षाने मला एबी फॉर्म दिला आहे. त्यामुळे मी धनुष्यबाणाची उमेदवारी करणारच आहे. माझ्या पक्षाच्या नेत्यांनी सांगितले असते तर मी माघार घेतली असती. सर्वसामान्य जनता माझ्यासोबत आहे. मी निवडणूक लढवणारच आहे, असेही भाऊसाहेब कांबळे यांनी म्हटले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या