मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका पार पडणार आहे. 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहे. राज्यात एकीकडे महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सामना रंगत आहेत. तर दुसरीकडे प्रहारचे बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि शेतकरी नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांची तिसरी आघाडी देखील निवडणुकीच्या आखाड्यात आहे. तर राज ठाकरेंची (Raj Thackeray) महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आणि प्रकाश आंबेडकरांची (Prakash Ambedkar) वंचित बहुजन आघाडीदेखील (Vanchit Bahujan Aghadi) निवडणुकीला सामोरे जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  IANS- MATRIZE ने ओपिनियन पोल जारी केला आहे. यात राज्यात महायुतीला यश मिळणार असून महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसलाय. तर महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. यामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढल्याचे दिसून येत आहे. तर लाडकी बहीण योजनेसह इतर योजनांमुळे महायुती आघाडीला फायदा होईल असे बोलले जात आहे. त्यातच आयएएनएस आणि मॅट्रीझ माध्यम समुहाने केलेल्या निवडणूक मतदानपूर्व सर्व्हेतून राज्यात महायुती की महाविकास आघाडी? जनतेचा कौल कुणाला? याबाबत अंदाज वर्तवण्यात आला आहे.


उत्तर महाराष्ट्रात महायुती की मविआ? 


'आयएएनएस'च्या सर्व्हेनुसार राज्यातील 288 मतदारसंघांचा आढावा घेतल्यास महायुतीची बाजू अधिक भक्कम दिसत आहे. महायुतीत भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 145 ते 165 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाला 106 ते 126 जागा मिळण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 47 जागा आहेत. त्यात 14 ते 16 जागांवर महायुतीला आणि 16 ते 19 जागा आघाडीच्या वाट्याला जाण्याचा अंदाज 'आयएएनएस'च्या सर्व्हेत वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीत चुरशीची लढत होणार असल्याचे दिसून येत आहे. मात्र, कुणाला किती जागा मिळणार? याचे चित्र 23 नोव्हेंबरलाच स्पष्ट होणार आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या


Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभा निवडणुकीला महायुती जिंकणार, IANS-Matrize च्या सर्व्हेवर अजित पवार, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...


Maharashtra Polls IANS- MATRIZE Survey: मुंबईत ठाकरे गटाला फटका, भाजप-शिंदे गट आघाडीवर; मनसेला किती जागा मिळणार?, ओपिनियन पोलची आकडेवारी समोर