मुंबई : माहीम विधानसभा मतदारसंघात (Mahim Assembly Constituency) मोठी चुरस सुरु आहे. विद्यमान आमदार आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर (Sada Sarvankar) विरुद्ध मनसेकडून अमित ठाकरे (Amit Thackeray) तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून महेश सावंत (Mahesh Sawant) अशी तिहेरी लढत होणार आहे.
राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना विधानसभेत पाठवण्यासाठी भाजपने आपली भूमिका जाहीर केली आहे. मात्र सदा सरवणकर उमेदवारी माघार घेणार नाहीत, आपण कोणत्याही परिस्थितीत लढणार असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला आहे. दरम्यान, सदा सरवणकर यांनी माध्यमांशी बोलताना राज ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्यावर तिरकस हल्लाबोल केला.
एकही आमदार नाही, त्यांनी मुख्यमंत्री कोण हे सांगणं हास्यास्पद
अमित ठाकरे आणि राज ठाकरे यांनी राज्यात भाजपचं सरकार सत्तेत येईल, मुख्यमंत्री जो होईल तो मनसे आणि भाजपच्या मदतीने होईल असं भाष्य केले होते. त्यावर सदा सरवणकर म्हणाले, "अशी वैयक्तिक मतं असतात, पण ज्याचा एकही आमदार नाही त्यांनी मुख्यमंत्री कोण हे सांगणं हे किती हास्यास्पद आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर टीका करावी असं मला वाटत नाही. मुख्यमंत्री कोण हे पुढे महायुती ठरवेल. मला एवढंच कळतं, मी या मतदार संघातून उभा राहणार आहे. महायुतीचा उमेदवार म्हणून आणि मी निवडून येणार आहे. लोकांचा मला आशीर्वाद आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
मी निवडणूक लढवणारच : सदा सरवणकर
दरम्यान, माहीम विधानसभेतून सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी, यासाठी महायुतीच्या नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. याबाबत विचारले असता ते म्हणाले की, मी माघार घेण्याचा प्रश्न नाही. महायुतीमध्ये मनसे नाही. मी एकटे पडलो नाही. मला जनतेचे आशिर्वाद आहे. मी ठासून आणि ठामपणे सांगतो मी निवडणूक लढवणार आहे आणि जिंकून येणार आहे. ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मी कार्यकर्त्यांच्या इच्छेसाठी निवडणूक लढवत आहे आणि निवडून येणार. जनता माझ्यासोबत आहे. मतदारांनी ही लढत एकतर्फी करायचे ठरवले आहे. आपल्याला 365 दिवस भेटणारा माणूस सहज आणि सेवेला उपलब्ध असेल्याला माणसाला निवडून द्यायचे हे जनतेने ठरवले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या