मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. सर्वच पक्षांचे उमेदवार आपल्या विजयाचे गणित जुळवण्यासाठी धडपड करत आहेत. शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी मुंबई आणि मुंबईतील मतदारसंघ चांगलेच महत्त्वाचे आहेत. त्यामुळेच या ठिकाणच्या जागा जिंकण्यासाठी येथे या दोन्ही गटांनी चर्चेतील चेहरे दिले आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने मुंबादेवी येथून शायना एन सी यांना तिकीट दिलंय. दरम्यान, एकीकडे प्रचाराला वेग आलेला असताना त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. विशेष म्हणजे या भेटीनंतर त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांच्यावर टीका केली.
शायना एन सी यांनी घेतली राज ठाकरेंची भेट
शायना एन सी आज (1 नोव्हेंबर) राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या बंगल्यावर गेल्या. येथे त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. शायना एन सी या शिंदेंच्या शिवसेनेच्या मुंबादेवीच्या उमेदवार आहेत. मनेसेने येथून ताकद पुरवल्यास शायना यांचा विजय सोपा हाऊ शकतो. त्याचीच चाचपणी करण्यासाठी शायना एन सी या राज ठाकरेंच्या भेटीला गेल्याचे म्हटले जात आहे. मनसेकडून पाठिंबा मिळाल्यास शायना एन सी यांना बळ मिळू शकते.
राज ठाकरेंच्या भेटीवर शायना एन सी काय म्हणाल्या?
दरम्यान, या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी बातचित केली. मी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यांना मी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या कुटुंबाचे आणि आमचे जुने पारंपरिक संबध आहेत. आमच्या या भेटीत राजकीय चर्चा झालेली नाही, असे शायना एन सी यांनी सांगितले.
शायना एन सी यांनी ऐकवली ऑडिओ क्लिप :
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते तथा खासदार अरविंद सावंत यांनी शायना एन सी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा दावा केला जातोय. यावरही शायना एन सी बोलल्या आहेत. एका महिलेला ते 'माल' म्हणून संबोधत आहेत.जो महिलांचा आदर करेल त्यालाच लोक निवडून देतील. आम्हीही अरविंद सावंत यांचा प्रचार केला होता, असे शायना एन सी म्हणाल्या.
23 तारखेला जनता तुमचे हाल करेल
तसेच, माझा माल असा उल्लेख केला तर जनता तुमचे 23 तारखेला हाल करेल. महिलांबाबत असं बोलणाऱ्या पक्षांची मानसिकता दिसून येतेय, असं त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी अरविंद सावंतांची ऑडिओ क्लिप ऐकवली. तसेच 2014, 2019 सालच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने त्यांनी मतं मागितली होती, अशी टीका शायना एन सी यांनी केली.
हेही वाचा :