नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजले असून राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सामना रंगणार आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) विधानसभा निवडणुकीत 'एकला चलो रे'चा नारा दिला आहे. मनसेकडून नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात (Nashik Central Assembly Constituency) जिल्हाध्यक्ष अंकुश पवार (Ankush Pawar) आणि नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात (Nashik East Assembly Constituency) शहर उपाध्यक्ष प्रसाद सानप (Prasad Sanap) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र महायुतीला अडचणीच्या ठरणाऱ्या जागांवर मनसे उमेदवारांना माघार घेण्याचा संदेश देण्यात आल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहे. 


एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला म्हणून नाशिकची ओळख होती. आता मनसेचा बालेकिल्ला ढासळला असून नाशिकवर पुन्हा एकदा कब्जा करण्यासाठी राज ठाकरेंकडून आपल्या शिलेदारांना मैदानात उतरवण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी अनेक उमेदवार घोषित केले आहे. नाशिक मध्य, पूर्व, पश्चिम, इगतपुरीसह, देवळालीत मनसेकडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. मात्र, राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना भाजपने पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्यानंतर मनसेनेही भाजपबाबत 'रिव्हर्स गिअर' घेतल्याची माहिती मिळत आहे. 


अंकुश पवार यांना माघारीचा निरोप? 


मनसेकडून नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांना तिकीट देण्यात आले आहे. त्यांनी उमेदवारी अर्जदेखील दाखल केला आहे. अंकुश पवार यांच्याकडून प्रचाराची तयारी देखील करण्यात आली आहे. या ठिकाणी भाजपच्या आमदार देवयानी फरांदे विरुद्ध ठाकरे गटाचे वसंत गिते यांच्यात लढत होत आहे. मनसेच्या उमेदवारामुळे भाजपला दगा फटका होऊ नये यासाठी अंकुश पवार यांना माघारीचा निरोप आल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहे. 


प्रसाद सानप नेमका काय निर्णय घेणार?


तर नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात शहर उपाध्यक्ष प्रसाद सानप यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. प्रसाद सानप यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे. त्यांचा सामना भाजपचे राहुल ढिकले आणि शरद पवार गटाचे गणेश गीते यांच्याशी होणार आहे. मात्र प्रसाद सानप यांच्यावर सामाजिक दबाव येत असल्याचे समजते. सानप यांची उमेदवारी येथे भाजपला पूरक असून एका उमेदवारासाठी सानप यांच्या माघारीसाठी प्रयत्न होत असल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत. आता प्रसाद सानप नेमका काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


आणखी वाचा 


Girish Mahajan : नाशिकमध्ये भाजपला बंडखोरीचे ग्रहण, 'डॅमेज कंट्रोल’साठी संकटमोचक गिरीश महाजन मैदानात, बंडोबांना थंड करण्याचं आव्हान